Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

अज्ञातवास
अज्ञातवास
अज्ञातवास
Ebook843 pages5 hours

अज्ञातवास

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

काही एका दुर्दैवी फेर्‍यात अडकल्यामुळे आपला व्यवसाय, शहर व घर सोडलेली आणि जगापासून अलिप्त राहण्यासाठी स्वत:भोवती अनामिकतेचा कोष विणलेली एक व्यक्ती दूरच्या शहरी, एका अनाम गल्लीतील एका छोट्या खोलीत आपला 'अज्ञातवास' शांततेत व्यतीत करण्यासाठी येते. व्यक्तीच्या अनामिकतेविषयी गल्लीला काही माहीत नसते वा त्याविषयी देणे-घेणेही नसते; पण गल्लीतील साहचर्य तसेच एकमेकांच्या गोष्टीत नाक खुपसण्याच्या मोकळ्या ढाकळ्या वातावरणामुळे ती व्यक्ती त्या गल्लीच्या चैतन्यपूर्ण जीवनप्रवाहात नकळतच ओढली जाते. इतरांच्या मदतीस सदैव तत्पर असलेली ती व्यक्ती गल्लीतील काहींच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते तर काहींच्या प्रेमाला पात्र होते.
अज्ञातवासाचे दिवस सरत असतानाच असे काही प्रसंग घडतात की त्या व्यक्तीची खरी ओळख पुढे येते. गल्ली आता त्या व्यक्तीवर प्रेम करू लागलेली असतानाच ती पुन्हा आपल्या पूर्वजगात जाण्याचा निर्णय घेते.
कोण असते ती व्यक्ती व काय असते तिची ओळख? आणि काय असते ते कारण, ज्यामुळे ती व्यक्ती 'अज्ञातवास' कंठीत असते?
काहीही सनसनाटी न घडणार्‍या शांत-निवांत, सुस्तावलेल्या शहरी त्या अज्ञातवासाच्या काळात त्या व्यक्तीच्या व गल्लीवासीयांच्या जीवनात घडणार्‍या काही सनसनाटी घडामोडी – प्रेम प्रकरणे, अपघात, मृत्य़ू, गोळीबार इत्यादीं शब्दांकीत करणारी ही 'अज्ञातवास' कादंबरी.

तसेच जीवनविषयक काही महत्वाचे संदेश देऊ पाहणारीही ही कादंबरी.
"आपण समजतो आपल्याला जीवन मिळाले आहे; पण प्रत्यक्षात जीवनानेच आपल्याला गाठले आहे. मनुष्यजीवन तसे सोपे नाही. ते निष्ठूर आणि कठोर आहे. फसवे आहे; बनावटी आहे आणि ढोंगी सुद्धा. आपण अनेक भ्रमात जगत असतो; पण प्रत्यक्ष जीवनात आपल्याला अनेक कठोर वास्तवांना सामोरे जावे लागते. वर्षे जशी सरतात तसे काही भ्रम तुटतात तर काही नवे भ्रम निर्माण होतात; पण परमेश्वराच्या कृपेने आपण त्यातून तरून जातो. आपले अनुभवविश्व विस्तारत जाते. पूर्वी अवघड वाटलेली जीवनातील काही वास्तवे आपण सहजी स्वीकार करू शकतो."
"जे इतरांची सेवा करतात; त्यांची दु:खे हलकी करतात; वेदना समाप्त करतात. आपले काम करताना सज्जनाला जसे ते आपले म्हणतात तसेच दुर्जनालाही. महारोग्यालाही जे दूर लोटत नाहीत. जे सत्याचे चाहते आहेत आणि ज्यांना अन्यायाची चीड आहे, त्यांना साक्षात परमेश्वरही इतरांपेक्षा जास्त आनंदाचे, स्नेहाचे, समाधानाचे वरदान देतो."
"आपल्या व्यवसायात आपण प्रामाणिक असावे. व्यवसायाला आपल्यातील शंभर टक्के उत्तम द्यावे. देता येत नसेल तर तो सोडून द्यावा."
"प्रत्येक जण कधी ना कधी चूक करतो; पण ज्याला आपली चूक उमजते व ती स्वीकार करता येते, तोच ती चूक सुधारू शकतो. त्यामुळेच चूक सुधारलेले लोक आपल्या पूर्वीच्या व्यवसायात नेहमी परत येऊ शकतात. या जगात बहुसंख्य लोक काचमहालात राहतात, त्यामुळे दुसर्‍याच्या घरावर तोच दगड टाकू शकतो जो कधीच चुकला नाही.
"मनुष्याचे जीवन एक वाहती सरिता आहे. त्यातील कोणताही डोह इतका खोल नाही की, कोणी त्यातून तरून बाहेर येऊ शकत नाही. फक्त तुमच्याकडे इच्छाशक्ती हवी."
"हे जग अनेक प्रकारच्या लोकांचे बनलेले आहे आणि त्यांतील काहीजण अपरिहार्यपणे दुर्गुणी, दुर्व्यसनी असणार. परमेश्वरही अशा लोकांप्रती दयाळू आहे. त्यामुळे 'दुर्गुणी व दुर्व्यसनी' लोकही इतरांसारखेच दयेला, क्षमेला पात्र असतात; पण यातील अधर्म व अन्याय असा आहे की, या दुर्गुण व दुर्व्यसनांमुळे दुष्टांपेक्षा सुष्टांना त्रास होतो. जीवन भयानक आहे – कदाचित सहन करण्यापलीकडे. चूक करतो एक आणि त्याचे दुष्परिणाम मात्र भोगावे लागतात इतर अनेकांना. कोणाच्या तरी अविवेकी कृत्याची किंमत दुसर्‍या कोणालातरी चुकवावी लागते. पापाची किंमत शेवटी दु:ख आणि वेदनेनेच चुकवावी लागते आणि तरीही ती कधीच चुकती होत नाही."

Languageमराठी
Release dateDec 14, 2022
ISBN9798215384336
अज्ञातवास

Related to अज्ञातवास

Related ebooks

Reviews for अज्ञातवास

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    अज्ञातवास - स्नेहल कृष्णाजी

    अज्ञातवास

    (कादंबरी)

    स्नेहल कृष्णाजी

    ©Copyright / प्रताधिकार

    ©स्नेहल घाटगे

    ©प्रतीक घाटगे

    या पुस्तकाचे सर्व प्रताधिकारहक्क[i] उपरिनिर्दिष्ट प्रताधिकारधारकांच्या स्वाधीन आहेत.

    All Rights Reserved.

    Disclaimer / अस्वीकृती

    प्रस्तुत कथानक हे लेखिकेच्या कल्पनेतून साकारलेले विश्व आहे. यात सुरुवातीला उल्लेखित विमान दुर्घटना प्रत्यक्षात घडली असली, तरी उर्वरीत कथानकात वर्णन केलेले प्रसंग, घटना व त्यात सहभागी पात्रे ही सर्व काल्पनिक आहेत.

    कादंबरीच्या काळात घडलेल्या प्रसंगांचे, घटनांचे वा त्यातील पात्रांचे प्रत्यक्षातील घटनांशी वा कोणा व्यक्तींशी काही साधर्म्य आढळलेच, तर तो केवळ विरळा योगायोग समजावा...

    विवरण

    लेखिका

    स्नेहल कृष्णाजी[ii]

    ए२, विधानी माऊंट व्ह्यू, सेक्टर १७,

    वाशी, नवी मुंबई,– ४००७०३

    2A, Vidhani Mount View, sectore 17, Vashi

    Navi Mumbai, 400703, India.

    +91 9867476531 /9820891866

    snehal.kg@gmail.com

    प्रकाशक

    शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई.

    A picture containing text, clipart Description automatically generated

    shabdavishwa@gmail.com

    प्रथम इ-आवृत्ती: एप्रिल २०१५ (शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई)

    द्वितीय इ-आवृत्ती नोव्हेंबर २०१८ (शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई)

    सुधारीत तृतीय इ-आवृत्ती जाने २०२० (शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई)

    सुधारीत चतुर्थ इ-आवृत्ती जाने २०२३ (शब्दविश्व प्रकाशन, नवी मुंबई)

    संपादक / Editor

    स्नेहल घाटगे

    अनुक्रम

    शीर्षक पान

    प्रताधिकार

    विवरण

    समर्पण

    मनोगत

    पूर्ववृतांत

    प्रकरण एक

    प्रकरण दोन

    प्रकरण तीन

    प्रकरण चार

    प्रकरण पाच

    प्रकरण सहा

    प्रकरण सात

    प्रकरण आठ

    प्रकरण नऊ

    प्रकरण दहा

    प्रकरण अकरा

    प्रकरण बारा

    प्रकरण तेरा

    प्रकरण चौदा

    प्रकरण पंधरा

    प्रकरण सोळा

    प्रकरण सतरा

    प्रकरण अठरा

    प्रकरण एकोणीस

    प्रकरण वीस

    प्रकरण एकवीस

    प्रकरण बावीस

    तत्पश्चात

    लेखिकेविषयी

    प्रकाशित पुस्तके

    आगामी पुस्तके

    समर्पण

    आपले काम निष्ठेने करीत जे इतरांची सेवा करतात; त्यांची दु:खे हलकी करतात; वेदना समाप्त करतात; आपले काम करताना सज्जनाला जसे ते आपले म्हणतात, तसेच दुर्जनालाही; महारोग्यालाही जे दूर लोटत नाहीत; जे सत्याचे चाहते आहेत आणि ज्यांना अन्यायाची चीड आहे; म्हणून परमेश्वराने ज्यांना इतरांपेक्षा जास्त सेवेचे, स्नेहाचे, आनंदाचे व समाधानाचे वरदान दिले आहे,

    वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असलेल्या व आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असलेल्या, अशा माझ्या सर्व समव्यावसायिकांना समर्पित....

    मनोगत

    नमस्कार वाचक मित्र आणि मैत्रिणीनों,

    खरे तर माझा लेखन प्रवास पंधरा वर्षांपूर्वी निवृत्तीनंतर सुरु झाला. तसे शालेय जीवनापासून जबरदस्त ज्ञानलालसा असल्याने वाचनाची भरपूर आवड होती. त्यातूनच अर्थात लेखन करण्याची इच्छा जागृत झाली. सुरुवातीला एक वैद्यकीय विद्यार्थीनी व पुढे एक फिजिशियन व वैद्यकीय प्राध्यापिका या दुहेरी जबाबदारीच्या पूर्णवेळ व्यस्ततेमुळे, वेळ न मिळाल्याने, लेखनाची माझी ही इच्छा व ऊर्मी दीर्घकाळ मनात सुप्तच ठेवावी लागली. निवृत्तीपूर्व दोन वर्षे वैयक्तिक जीवनात अत्यंत कठीण व दु:खद परिस्थितीचा सामना करावा लागल्याने, उर्वरित आयुष्य आनंदात जगण्याचे ठरवीत, निवृत्तीनंतर जीवनाला एक वेगळी दिशा देत, आवडीचा छंद जोपासत आनंदी राहण्याचे ठरवून मी लेखनाकडे वळले.

    सन १९५५-१९६६ या दशकात शालेय शिक्षण मायबोली मराठीतून झाल्याने, अर्थातच ‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।’ असे संत ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या मराठी भाषेशी माझे घट्ट नाते आहे. तसेच वाचनाने समृद्ध झालेली त्या भाषेतील विपुल शब्दसंपदा आहे. त्यामुळे लेखनाची सुरुवात मायमराठीतून होणे साहजिकच होते.

    दीर्घकाळ वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असल्याने,  सामान्यांमध्ये ज्ञानप्रसार व्हावा, या उद्देशाने प्रथम सन २००७ पासून आरोग्यावश्यक आहारघटकांविषयी शास्त्रीय माहिती देणाऱ्या ‘आरोग्य व आहार’ या मराठी वेबदैनंदिनीतून लेखनाची सुरुवात झाली. दरम्यान योगायोगाने मराठीतील प्रतिथयश सिद्धहस्त लेखक श्री. संजय सोनवणी यांचा परिचय झाला. त्यांनी कल्पनारम्य लेखन करण्यास प्रोत्साहित केले. त्यांची मी कायमच ऋणी आहे.

    सन २०१० पासून मी मराठीत सर्जनशील कल्पनारम्य लेखन सुरू केले. मी लिहावे, यासाठी माझा मुलगा प्रतीक यानेही सतत पाठपुरावा केला. अभ्यासासाठी जागताना त्याला आईची सोबत हवी म्हणून मीही जागल्याने, लिहिण्यासाठी मला शांत निवांत रात्री मिळाल्या, त्यामुळे माझ्या पहिल्या पुस्तकाचा मसूदा मी काही महिन्यांच्या काळात पुरा करू शकले. त्याचीच परिणती म्हणजे ऑगष्ट २०१४ मध्ये, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने छापील स्वरुपात प्रकाशित केलेली व श्री. संजय सोनवणी यांची समर्पक प्रस्तावना लाभलेली ‘कायापालट’ ही माझी पहिली मराठी कादंबरी.

    त्यानंतर २०१८ मध्ये मी ही कादंबरी इ-पुस्तक स्वरुपात प्रकाशित केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

    त्यानंतरही अर्थातच लेखन प्रवास चालू आहे आणि सन २०१५ मध्ये मुलगा परदेशी गेल्यानंतर, तर लेखनासाठी मी पूर्ण वेळ देऊ शकले आहे. त्यामुळे ‘कायापालट’ नंतर मी ‘अज्ञातवास’ (कादंबरी), ‘अनाकलनीय’ (गूढकथासंग्रह), ‘अंतरिक्षातून’ (अंतरिक्षकथा) ‘विलक्षण पृथ्वीप्रदक्षिणा’ (साहसी फुगेयान प्रवास), ‘हरवलेली’ (साहसी जलप्रवास), ‘अजब मुलांच्या गजब कथा’ (किशोरकथा), ‘आद्यकर्मी इलिजाबेथ’ (चरित्र) इत्यादी सह अनेक मराठी इ-पुस्तके प्रकाशित करू शकले आहे. छापील स्वरुपात प्रकाशित झालेले माझे प्रथम पुस्तक ‘कायापालट’ वगळता माझी सर्व पुस्तके इ-पुस्तक स्वरुपात प्रकाशित आहेत. त्यामुळे इ-पुस्तके वाचणार्‍या वाचकांना मी थोडीफार माहीत असावी, अशी आशा आहे. परंतु छापील पुस्तके वाचणार्‍या वाचकांना मात्र मी तशी बरीचशी अनोळखीच आहे. तरीही माझ्या सर्व इ-पुस्तकांना वाचकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे व देत आहेत. त्यांची मी ऋणी आहे. त्यांच्या या भरघोस प्रतिसादामुळेच मला पुढील लेखनाला उत्साह व उर्जा मिळते.

    माझे सर्वात मोठे लेखनकार्य, ज्याला magnus opus म्हणता येईल ते आहे, डॉ. इलिझाबेथ ब्लॅकवेल या एकोणिसाव्या शतकातील एका आद्यकर्मी (पायोनिअर Pioneer) स्त्रीचे चरित्र. ज्या एकोणिसाव्या शतकात स्त्रियांना प्राथमिक शिक्षणही उपलब्ध नव्हते व वैद्यकीय शिक्षण तर वर्जच होते, त्या शतकाच्या मध्यात इलिजाबेथ ब्लॅकवेल या स्त्रीने सर्व सामाजिक अडचणींविरुद्ध प्रयत्न करून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला व आधुनिक वैद्यकाची ती जगातील ‘प्रथम महिला डॉक्टर’ बनली. अशा या इलिझाबेथच्या जीवनकथेने, तशाच परिस्थितीतून गेलेल्या माझ्या मनाची पकड घेतली नसती तरच आश्चर्य! आद्यकर्मी इलिजाबेथच्या जीवनापासून प्रेरित होऊन, मी तिचे जीवनचरित्र मराठीत लिहिले आहे. या चरित्रामुळे मराठी तरुणी /तरुणांच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे.

    सामाजिक कादंबरी, साहसी प्रवास, गूढकथा, जीवनचरित्र या क्षेत्रात लिहिल्यानंतर, जुलै २०२१ मध्ये ‘एक गहन षड्‌यंत्र’ ही गुन्हेगारी रहस्य कादंबरी मी आपण वाचकांना सादर केली. कोणतीही रहस्य कथा, त्यातही गुन्हेगारी रहस्य कादंबरी लिहिण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. इथे वैद्यकीय क्षेत्रातील माझ्या ज्ञानाचा व अनुभवांचा आधार मी घेतला. कादंबरीत काही वैद्यकीय रहस्य नाही, परंतु हे काल्पनिक कथानक एका काल्पनिक डॉक्टरच्या आयुष्यात घडल्याने, त्याने ते शब्दबद्ध केले आहे.

    तशी ‘अज्ञातवास’ ही माझी दुसरी प्रकाशित कादंबरी आहे. ती प्रथम एप्रिल २०१५ मध्ये इ-पुस्तक स्वरुपातच प्रसिद्ध केली. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ व जानेवारी २०२० मध्ये तीची सुधारीत आवृत्ती प्रसिद्ध केली व आता नवीन मुखपृष्ठ व सुधारीत मसूद्यासह तीची चौथी आवृत्ती इ-प्रकाशित करीत आहे.

    काही एका दुर्दैवी फेर्‍यात अडकल्यामुळे आपला व्यवसाय, शहर व घर सोडलेली आणि जगापासून अलिप्त राहण्यासाठी स्वत:भोवती अनामिकतेचा कोष विणलेली एक व्यक्ती दूरच्या शहरी, एका अनाम गल्लीतील एका छोट्या खोलीत आपला ‘अज्ञातवास’ शांततेत व्यतीत करण्यासाठी येते. व्यक्तीच्या अनामिकतेविषयी गल्लीला काही माहीत नसते वा त्याविषयी देणे-घेणेही नसते; पण गल्लीतील साहचर्य तसेच एकमेकांच्या गोष्टीत नाक खुपसण्याच्या मोकळ्या ढाकळ्या वातावरणामुळे ती व्यक्ती त्या गल्लीच्या चैतन्यपूर्ण जीवनप्रवाहात नकळतच ओढली जाते. इतरांच्या मदतीस सदैव तत्पर असलेली ती व्यक्ती गल्लीतील काहींच्या जीवनात महत्वाची भूमिका निभावते तर काहींच्या प्रेमाला पात्र होते.

    अज्ञातवासाचे दिवस सरत असतानाच असे काही प्रसंग घडतात की, त्या व्यक्तीची खरी ओळख पुढे येते. गल्ली आता त्या व्यक्तीवर प्रेम करू लागलेली असतानाच ती पुन्हा आपल्या पूर्वजगात जाण्याचा निर्णय घेते.

    कोण असते ती व्यक्ती व काय असते तिची ओळख? आणि काय असते ते कारण, ज्यामुळे ती व्यक्ती ‘अज्ञातवास’ कंठीत असते?

    काहीही सनसनाटी न घडणार्‍या शांत-निवांत, सुस्तावलेल्या शहरी त्या अज्ञातवासाच्या काळात त्या व्यक्तीच्या व गल्लीवासीयांच्या जीवनात घडणार्‍या काही सनसनाटी घडामोडी – प्रेम प्रकरणे, अपघात, मृत्य़ू, गोळीबार इत्यादीं शब्दांकीत करणारी ही ‘अज्ञातवास’ कादंबरी.

    तसेच जीवनविषयक काही महत्वाचे संदेश देऊ पहाणारीही ही कादंबरी...

    आपण समजतो आपल्याला जीवन मिळाले आहे; पण प्रत्यक्षात जीवनानेच आपल्याला गाठले आहे. मनुष्य जीवन तसे सोपे नाही. ते निष्ठूर आणि कठोर आहे. फसवे आहे; बनावटी आहे आणि ढोंगी सुद्धा. आपण अनेक भ्रमात जगत असतो; पण प्रत्यक्ष जीवनात आपल्याला अनेक कठोर वास्तवांना सामोरे जावे लागते. वर्षे जशी सरतात तसे काही भ्रम तुटतात तर काही नवे भ्रम निर्माण होतात; पण परमेश्वराच्या कृपेने आपण त्यातून तरून जातो. आपले अनुभवविश्व विस्तारत जाते. पूर्वी अवघड वाटलेली जीवनातील काही वास्तवे आपण सहजी स्वीकार करू शकतो.

    जे इतरांची सेवा करतात; त्यांची दु:खे हलकी करतात; वेदना समाप्त करतात. आपले काम करताना सज्जनाला जसे ते आपले म्हणतात तसेच दुर्जनालाही. महारोग्यालाही जे दूर लोटत नाहीत. जे सत्याचे चाहते आहेत आणि ज्यांना अन्यायाची चीड आहे, त्यांना साक्षात परमेश्वरही इतरांपेक्षा जास्त आनंदाचे, स्नेहाचे, समाधानाचे वरदान देतो.

    आपल्या व्यवसायात आपण प्रामाणिक असावे. व्यवसायाला आपल्यातील शंभर टक्के उत्तम द्यावे. देता येत नसेल तर तो सोडून द्यावा.

    प्रत्येक जण कधी ना कधी चूक करतो; पण ज्याला आपली चूक उमजते व ती स्वीकार करता येते, तोच ती चूक सुधारू शकतो. त्यामुळेच चूक सुधारलेले लोक आपल्या पूर्वीच्या व्यवसायात नेहमी परत येऊ शकतात. या जगात बहुसंख्य लोक काच महालात राहतात, त्यामुळे दुसर्‍याच्या घरावर तोच दगड टाकू शकतो जो कधीच चुकला नाही.

    मनुष्याचे जीवन एक वाहती सरिता आहे. त्यातील कोणताही डोह इतका खोल नाही की, कोणी त्यातून तरून बाहेर येऊ शकत नाही. फक्त तुमच्याकडे इच्छाशक्ती हवी.

    हे जग अनेक प्रकारच्या लोकांचे बनलेले आहे आणि त्यांतील काहीजण अपरिहार्यपणे दुर्गुणी, दुर्व्यसनी असणार. परमेश्वरही अशा लोकांप्रती दयाळू आहे. त्यामुळे ‘दुर्गुणी व दुर्व्यसनी’ लोकही इतरांसारखेच दयेला, क्षमेला पात्र असतात; पण यातील अधर्म व अन्याय असा आहे की, या दुर्गुण व दुर्व्यसनांमुळे दुष्टांपेक्षा सुष्टांना त्रास होतो.

    जीवन भयानक आहे – कदाचित सहन करण्यापलीकडे. चूक करतो एक आणि त्याचे दुष्परिणाम मात्र भोगावे लागतात इतर अनेकांना. कोणाच्या तरी अविवेकी कृत्याची किंमत दुसर्‍या कोणालातरी चुकवावी लागते. पापाची किंमत शेवटी दु:ख आणि वेदनेनेच चुकवावी लागते आणि तरीही ती कधीच चुकती होत नाही.

    माझ्या इतर पुस्तकांप्रमाणेच, याही पुस्तकाला आपण पुन्हा एकदा भरभरून प्रतिसाद द्याल या आशेसह...

    धन्यवाद. असाच लोभ असावा...

    स्नेहल कृष्णाजी.

    डिसेंबर २०२२

    २४ जून १९८५

    A picture containing diagram Description automatically generated पीटीआय वार्ताहराकडून:

    आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार, काल दिनांक २३ जून रोजी, मॉन्ट्रियल–लंडन–दिल्ली या मार्गावरील एअर-इंडिया उड्डान १८२ च्या ‘कनिष्क’ बोईंग ७४७-२३७-बी या विमानाचा हवेतच स्फोट झाल्याने ते अटलांटिक महासागरात कोसळले आहे. विमानातील एकूणएक ३२९ प्रवाशांना अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली असावी अशी शंका आहे.

    या प्रवाशांमध्ये २८० प्रवासी कॅनडाचे, २७ ब्रिटनचे तर २२ प्रवासी भारतीय आहेत असे कळते. स्फोट झाला तेव्हा ‘कनिष्क’ आयरिश हवाईहद्दीतून ३१००० हजार फुटांवरून उड्डान करीत होते.

    पूर्ववृतांत

    ते एक मध्यम आकाराचे नगर होते...

    एका मोठ्या पर्वतरांगेतील घनदाट जंगलाने व्यापलेल्या एका अनामिक दुर्गम डोंगर उतारावर वसलेले व निसर्गसौंदर्याने नटलेले. नाव काहीही असले तरी नावाच्या शेवटी ‘पूर’ अथवा ‘नगर’ काहीही लिहता येईल असे. म्हटले तर शहर म्हटले तर नगर. फारसे काही सनसनाटी न घडणारे, शांत निवांत! जवळच हमरस्ता असूनही सुस्तावलेले.

    नगराजवळून जाणाऱ्या हमरस्त्याचा एक फाटा पुढे डोंगरमाथ्यावरच्या थंड हवेच्या ठिकाणी जात होता. हमरस्त्यापलीकडे भलेमोठे जंगल होते. जंगल खूपच मोठे असल्याने जवळच्या नगराचा तिथे आभासही होत नसे. नगरापासून जवळच हमरस्त्यावर एक पेट्रोलपंप व बाजूला एक बऱ्यापैकी तीन तारांकित हॉटेल होते. नगरवासियांच्या दृष्टीने ते खास होते. अधूनमधून बदलासाठी किंवा पार्टीसाठी नगरवासी तिथे जात.

    नगरात पालिकेचे एक बऱ्यापैकी मोठे उद्यानही होते. कोणत्याही नगरात असतात तसेच अनेक रस्ते व अनेक गल्ल्या होत्या. त्या रस्त्यांची व गल्ल्यांची प्रत्यक्षातील नावे काहीही असली, तरी आपल्या या कथानकात एका गल्लीचा व एका रस्त्याचा संबंध आहे व त्यांचा वारंवार उल्लेख येणार आहे. मूळात हे कथानक अनामिक व्यक्तीच्या अज्ञातवासाचे असल्याने त्या गल्लीचे नाव अनामिक राहणेच जास्त योग्य आहे. त्यामुळे गल्लीचा व रस्त्याचा उल्लेख आपण नुसतीस ‘गल्ली’ व ‘गल्लीतील रस्ता’ असा करुया.

    प्राचीन काळापासून वसलेल्या या नगरात जागेची टंचाई नव्हती. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाची स्वतंत्र घरे होती; जी बऱ्यापैकी मोठी होती. काही घरे बैठी व काही तीमजली असली तरी बहुसंख्य घरे दुमजली होती. काही घरांना मागेपुढे तर काहींना चारीबाजूंनी आवार होते. आजकाल काही मोजक्या उंच इमारतींही – जिथे प्रत्येक मजल्यावर वेगवेगळी कुटुंबे रहात – दिसू लागल्या होत्या.

    गल्लीत राहणारे लोकही विविध धर्मांचे व अठरापगड जातीचे होते. मिश्र वस्तीची असली तरी ही गल्ली खेड्यातील गल्लीसारखे आपले गल्लीपण टिकवून होती. प्रत्येक कुटुंब दुसऱ्या कुटुंबाला ओळखत होते. इथे मैत्री होती; साहचर्य होते; सहकार होता. शेजारी शेजाऱ्यांना ओळखत होते. एकमेकांना मदत करीत होते. एकमेकांच्या सणांत व कार्यात सहभागी होण्यासाठी एकमेकांना निमंत्रित केले जात होते. गल्लीतील प्रत्येकाला एकमेकांविषयी खडा न खडा माहिती होती. सगळे गल्लीवासी एकमेकांच्या सुखदु:खात वाटेकरी होत होते आणि त्याचमुळे दुसऱ्यांच्या गोष्टी आपल्या समजून त्याविषयी चर्चा करण्याचा वा त्यात नाक खुपसण्याचा आपला हक्क राखून होते.

    गल्लीच्या मधोमध एक मोठा लांबलचक रस्ता दक्षिणोत्तर पसरला होता. वृक्षाच्या खोडाला जशा फांद्या-उपफांद्या फुटतात, तसेच या मोठ्या रस्त्याला अनेक लहान रस्ते व बोळे फुटली होती. दक्षिणोत्तर पसरलेल्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ओळीने घरे होती. रस्त्याच्या एका टोकाकडून पाहिल्यास घरांच्या त्या दोन ओळी सुरुवातीला दुभंगल्यासारख्या दिसत परंतु दूरवर मात्र एकत्र आल्यासारख्या वाटत.

    सन १९८६च्या जून महिन्यातील एका दुपारी त्याच रस्त्याने तो चालत होता. रस्त्याच्या पश्चिमबाजूला असलेल्या एका घरातून तो नुकताच बाहेर पडला होता.

    फारफार वर्षांपूर्वी वाडवडिलांच्या काळात, जेव्हा कुटुंबाची सांपत्तिक स्थिती संपन्न होती तेव्हा, उंच चौथऱ्यावर बांधलेले सिमेंट-विटांचे ते दुमजली घर होते. चारी बाजूंनी आवार असलेले. पदपथावर असलेल्या आवाराच्या फाटकापासून एक छोटी पायवाट घराच्या पायऱ्यांपर्यंत जात होती. तिथून सुरू झालेल्या घराच्या दगडी पायऱ्या थेट घराच्या मुख्य दरवाजापर्यंत जात होत्या, जो एका छोट्या प्रवेशदालनात उघडत होता.

    प्रवेशदालनात शिरल्यावर डाव्या हाताला वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक जिना होता. समोरच दुसरा दरवाजा होता, जो मुख्य दिवाणखान्यात उघडत होता. मुख्य दिवाणखाना बऱ्यापैकी मोठा होता. या दिवाणखान्यात डाव्या हाताला दक्षिण भिंतीजवळ जेवणाचे टेबल मांडलेले होते. बैठकीच्या मागे दोन खोल्या होत्या. त्यापैकी डाव्या बाजूला स्वयंपाकघर होते ज्याचा दरवाजा जेवणाच्या टेबलाजवळ उघडत होता. उजव्या हाताला दुसरी खोली होती ज्याचा दरवाजा बैठकीच्या दरवाजासमोरच उघडत होता व या खोलीत शिलाईमशीन होते.

    प्रवेशदालनाच्या उजव्या बाजूला जिन्याच्या विरुद्धदिशेला एक दरवाजा होता, जो दुसऱ्या दिवाणखान्यात उघडत होता. हा दुसरा दिवाणखाना मध्यम आकाराचा होता. त्या दिवाणखान्याला मागेही एक दरवाजा होता जो मागच्या एका खोलीत उघडत होता. त्या मागच्या खोलीचा दुसरा दरवाजा मुख्य दिवाणखान्यात उघडत होता.

    दोन दिवाणखाने व स्वयंपाकघर मिळून तळ मजल्यावर एकंदर पाच खोल्या होत्या. जिन्याने वर गेल्यावर घराच्या दर्शनी बाजूला एक लांबलचक बंदिस्त सज्जा होता ज्याला ओळीने खिडक्या होत्या. या सज्ज्यात एकंदर तीन शयनगृहांचे दरवाजे उघडत होते. ही शयनगृहे मुख्य दिवाणखान्यावर दोन व छोट्या दिवाणखान्यावर एक अशी होती.

    घराच्या आवाराला चारीबाजूंनी लाकडी कुंपण होते ज्याला पांढरा रंग दिलेला होता. त्यावर सर्वत्र गारवेल चढवली होती. मागच्या आवारात काही छोटे वृक्ष व फुलझाडे होती. आवाराच्या कुंपणाजवळ दर्शनी आग्नेय कोपऱ्यात एक मोठा चिंचेचा वृक्ष होता.

    आजूबाजूला याहूनही बरीच चांगली व श्रीमंत वाटणारी घरे होती; पण तरीही हे घर त्या सगळ्यात उठून दिसत होते. इतर घरे फक्त निवाऱ्यासाठी असावीत असे वाटे; पण हे घर मात्र खरे घर वाटे. नीटनेटके, सभ्य, स्वाभिमानी. प्रत्येक खिडकीला स्वच्छ, सुंदर पडदे लावलेले. दारातील पायपुसणे तसूभरही इकडेतिकडे न झालेले. मागचे अंगणही नेहमीच नीटनेटके असलेले. अत्यंत सुंदर रितीने गारवेल वाढविलेल्या पांढऱ्या कुंपणाचे.

    त्या नगराचे ते शांत-निवांत सुस्तावलेपण, त्यातील त्या गल्लीचे वातावरण व गल्लीतील दक्षिणोत्तर रस्त्याचे दृष्य आवडलेल्या त्या व्यक्तीला, ते घरही अतिशय आकर्षक, हवेहवेसे वाटले. वापरात असलेला एखादा जुनापुराना ढगळ शर्टही मापाच्या नव्या शर्टापेक्षा आरामदायी वाटावा तसा. इथे राहण्याचा विचार त्याच्या मनाला आनंद देऊन गेला. इथे नक्कीच आपल्याला शांतता मिळेल; वाचनासाठी दीर्घ संध्याकाळी मिळतील. रात्रीच्या नीरव शांततेत सगळे विसरले जाऊन झोपही छान लागेल. त्या व्यक्तीला अजून हे माहीत नव्हते की, स्वत:च्या घरासारखे आरामदायी व हवेहवेसे वाटणारे सारे काही इथे या घरात होते. अर्थात ते तसे नसते, तरीही त्याला त्याची पर्वा नव्हती.

    वयाने तो तीसपेक्षा काही थोडी वर्षेच जास्त होता. इथे येण्याअगोदर आयुष्यातील काही काळ त्याने भटकण्यात व्यतीत केला होता. फार वर्षे जरी नसली तरी त्याच्यादृष्टीने तो काळ खूप प्रदीर्घ होता.

    त्या दुमजली घरी कुणी त्याची फार चौकशी केली नव्हती किंवा ओळखीच्या लोकांच्या शिफारशीही मागितल्या नव्हत्या. मागितली असती तर एकदोन शिफारसपत्रे त्याने दिलीही असती. बऱ्याच मेहनतीने त्याने ती मिळविली होती आणि आता इथे त्याबद्दल कोणी विचारलेही नव्हते.

    तो उभा होता तेथून थोड्या अंतरावर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या एका घराच्या खिडकीवर त्याला एक बोर्ड लटकविलेला दिसला. त्यावर लिहिले होते,

    सावंत खानावळ

    जेवण – एकवेळ रु. १५ /-

    न्याहारी – एकवेळ रु. ३ /-

    छोटे दुकानदार वा कारकूनांसारखी दिसणारी काही मंडळी तेथून लगबगीने बाहेर पडताना दिसत होती. बहुतेक दुपारच्या जेवणाची वेळ संपली असावी. तेवढ्यात खिडकीचे पडदे सारले गेलेले त्याने पाहिले. आतून रेडिओवर वाजत असलेल्या गाण्याचे आवाज येऊ लागले.

    घर आया मेरा परदेसी...

    रस्त्याच्या या बाजूचा तो मनुष्य दु:खद हसत म्हणाला, घर!

    प्रकरण एक

    वसंत धवणे रस्त्यावरून इकडेतिकडे भटकत होता...

    गेला तासभर वारंवार समोरच्या घराकडे पहात होता. घडाळ्यात न पाहताही किती वाजलेत हे त्याला माहीत होते. तरीही रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात त्याने आपल्या घडाळ्यात पाहिले. आठ वाजता तो इथे आला, तेव्हा रस्त्यावर बरीच वर्दळ होती. त्याच्या मनात आशा होती; त्याचे बारीक खांदे ताठ होते; पण आता नऊची वेळ होताहोता रस्ता जवळजवळ रिकामा होऊ लागला होता. त्याचबरोबर त्याचे मन निराशेने काळवंडले होते व खांदेही खाली झुकले होते.

    खिशातून रुमाल काढून त्याने आपल्या कपाळावरचा घाम पुसला. ती नेहमीच त्याला असे वागवीत होती. वाट पहायला लावीत होती. खूप वेळ वाट पहात तो उभा आहे याची खात्री झाल्यावरच ती शांतपणे बाहेर येईल. त्याच्या मनात आले, ‘शप्पथ. आपण तिला फसविलेच पाहिजे. कधीतरी आपणही वाट न पाहता निघूनच गेले पाहिजे. मग बसेल काळजी करीत. कोणाला दुखावण्याचा तिचा स्वभाव नाही त्यामुळे ती नक्कीच आपली काळजी करेल. करू देत.’

    जूनचा उकाड्याचा महिना, त्यात रात्रीची नीरव शांतता होती. बहरलेल्या चिंचेमुळे वातावरण मंद सुवासाने भरून गेले होते. आकाशात चंद्र बराच वर आल्याने झाडाच्या फांद्यांमधून झिरपत असलेला मंद चंद्रप्रकाश घराच्या मुख्य दरवाजावर पडलेला होता आणि वाऱ्यासोबत हालणाऱ्या फांद्यांमुळे तो प्रकाशही हालत होता.

    तिने जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्या हालत्या मंद चंदेरी प्रकाशात ती न्हाऊन निघाली. घरात उकाडा असल्याने तिच्या कपाळावर घामाच्या धारा होत्या. पुढचे केसही घामाने चिंब झाले होते. बाहेर येताच दरवाजा बंद करून ती दगडी पायऱ्यांवर उभी राहिली. थंड वारे अंगावर घेण्यासाठी आपले बाहू पसरले.

    रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा असलेला वसंत तिला प्रेमळ नजरेने न्याहाळू लागला. ती समोर नसे तेव्हा तो खूप धीट असे; पण तिला समोर पाहिल्यावर मात्र तो एकदम मवाळ होऊन जाई. तिला पाहताच तो रस्ता पार करून येऊ लागला. आवाराचे फाटक उघडत तो तिला न्याहाळू लागला. त्याची प्रेमळ नजर आता तिची पूजाच करू लागली होती.

    हे, गौरी.

    उशीर झाला मला. आईला मदत करीत होते.

    हं. ठीक आहे.

    गौरी घराच्या वरच्या पायरीवर बसली. तिच्याखाली दोन पायऱ्या सोडून तो तिच्या पायांशी बसला. तिच्याजवळ बसल्यानंतर तो थोडा निवांत झाला. वरच्या पायरीवर आपले कोपर टेकवून तो आकाशातील चंद्राकडे पाहू लागला; पण खरे तर त्याचे निळे डोळे मात्र गौरीच्या चेहऱ्याकडेच लागलेले होते. तो खूप आनंदात दिसत होता.

    लवकरच बाहेर आले असते; पण आई थकली होती. तुला जया दिसली का? गौरीने विचारले.

    हो. ती नागेशसोबत घरी जाताना दिसली. तो जयासाठी वेडा झाला आहे. तशी ती सुंदर आहे; पण माझ्या टाईपची नाही. वसंतने उत्तर दिले.

    हं. मग तुझ्या टाईपची कोण आहे?

    तू.

    ती हलकेच हसली. तू तर कोंबडाच आहेस, वसंत. पायरीवर आरामशीर बसत गौरीने एक दीर्घ श्वास घेतला. खूप खूप थकलेय आज. अरे हो, एक गोष्ट मी तुला सांगितलीच नाही. आम्ही घरात एक भाडेकरू ठेवला आहे.

    काय?

    भाडेकरू. थोडीशी खजील होतच ती म्हणाली. घरी भाडेकरू ठेवणे ही त्या गल्लीत चांगली गोष्ट समजली जात नव्हती. खरे तर आईला हे मुळीच आवडलेले नाही; पण येणाऱ्या पैशांतून घरखर्चाला मदत होईल म्हणून मीच पुढाकार घेतला.

    भाडेकरू स्त्री आहे की, पुरुष?

    पुरुष.

    कसला पुरुष?

    मला काय माहीत? आज रात्री तो इथे रहायला येणार आहे. मग कदाचित एका आठवड्याभरात तुझ्या प्रश्नाचे उत्तर मला देता येईल.

    या बातमीमुळे वसंत चिंतेत पडला आणि सरसावून ताठ बसत त्याने विचारले, तो तरुण आहे का वृद्ध?

    अं? हं. वयाने तुझ्यापेक्षा बराच मोठा आहे; पण त्याला वृद्ध वगैरे म्हणता येणार नाही.

    वसंत एकवीस वर्षांचा होता आणि वयाला साजेसा भावनाशील होता. दोन दिवसांत तो तुझ्यासाठी वेडा होईल.

    गौरी जोरात हसली. पण मी काही त्याच्या प्रेमात पडणार नाही याची खात्री बाळग. तो एकदम गंभीर आहे आणि कानांजवळचे काही केसही सफेद होऊ लागलेत.

    या माहितीने वसंताच्या मनातील चिंतेची जागा आनंदाने घेतली. नाव काय त्याचे?

    श्रीयुत स. दा. पैपावणे.

    सदा पै? की पावणे?

    नाही, स. दा. पैपावणे.

    नाव थोडे विचित्रच वाटते. खरे नाव आहे हे?

    हो. त्याने तसेच सांगितले.

    भाडेकरूच्या नावाबरोबरच त्याच्याविषयीची वसंतची उत्सुकता संपली. गौरीच्या सहवासात त्याला नेहमीच आनंद मिळे; आताही तो त्या आनंदातच बुडून गेला. तिच्याबद्दलचे खूप विचार त्याच्या मनात गर्दी करून होते; पण ते शब्दांत कसे मांडावेत हेच त्याला समजत नव्हते. ती जवळ नसे तेव्हा तिच्याशी काय आणि कसे बोलावे हे ठरविणे सोपे होते; पण तिच्या पायांशी बसल्यावर, हालचालीसरशी तिच्या दुपट्ट्याचा स्पर्श त्याला होत असताना, तिचा सुंदर उत्सुक चेहरा त्याच्याकडे वळलेला असताना मात्र त्याची जीभ जड होऊन तो नेहमीच निश्शब्द होत असे.

    अचानकच गौरीने जांभई दिली. त्याला थोडा रागच आला. तुला जर झोप आली असेल तर –

    मूर्खासारखा बोलू नकोस. तू इथे बसलेला मला आवडते. काल रात्री मी एक पुस्तक वाचत होते त्यामुळे खूप उशिरापर्यंत जागरण झाले.

    काय होते एवढे त्या पुस्तकात? वसंतने विचारले.

    त्या पुस्तकातील एका पुरुषपात्राच्या मते, प्रत्येक पुरुष ज्या स्त्रीची काळजी करतो तिच्यावर आपली छाप सोडतो.

    अस्सं?

    पण माझ्यामते, ती जशी असावी असे त्या पुरुषाला वाटते तशीच बनण्याचा प्रयत्न ती स्त्री करते – अर्थात त्याच्या सहवासात असेपर्यंत काही काळ तरी. पण, तरीही कधीच पुन्हा ती पूर्वीची स्वत: रहात नाही. याबाबतीत तुला काय वाटते?

    जीवनातील महत्चाच्या विषयांवर थेट बोलणे टाळणे, ही कदाचित कोवळ्या तरुणाईची पद्धतच असावी. त्यामुळेच, धोकादायक निसरड्या वळणावर चालणे टाळावे, त्याप्रमाणे विषय टाळण्यासाठी पात्राच्या तोंडी असलेल्या ‘प्रेम करतो’ या शब्दांऐवजी गौरीने ‘काळजी करतो’ हे शब्द वापरले होते.

    क्षणभराने ती स्वत:शीच म्हणाली, हूं. प्रत्येक पुरुष म्हणे. स्त्रीची काळजी करणारे असे किती पुरुष या जगात आहेत? मग त्याची फिरकी घेण्यासाठी ती गमतीने पुढे म्हणाली, अर्थात कोवळ्या तरुण वयात तिच्यावर प्रेम करणारा एक मुलगा आहे म्हणा. वसंत ताठ झाला. पण त्या वेडेपणातून ते दोघेही बाहेर येतात. त्यानंतर तिच्यावर प्रेम करणारे दोन स्पर्धक पुरुष तिच्या आयुष्यात येतात. त्यापैकी एकाशी ती लग्न करते. म्हणजे एकंदर झाले तिघे. आणि –

    पण मी म्हणतो – त्या वेडेपणातून ते बाहेरच का येतात? त्याचा आवाज अत्यंत थरथरत होता.

    ओह! ते काही मला माहीत नाही. कदाचित नंतर त्यांचे विचार बदलत असावेत. काही असो. त्या पुस्तकात जे लिहिले आहे ते मी तुला सांगितले.

    खुळचटच पुस्तक आहे ते.

    त्यात काही तथ्य असेल असे मलाही वाटत नाही. पण सुरुवात केल्यावर जिज्ञासेपोटी मी वाचत गेले. तिने कबूल केले.

    जिज्ञासेपोटी की, उत्सुकतेपोटी? हे जर तिला कळले असते तर. प्रबळ जीवनेच्छा व जीवनाचा आस्वाद घेण्याची ऊर्मी असलेली ती एक वीस वर्षांची अल्लड तरुणी होती. मनात जबर महत्वाकांक्षा होती; हातून काहीतरी करून दाखविण्याचे धैर्य होते. घराच्या पायऱ्यांवर बसलेली असतानाही तिचे कल्पक मन तिला त्या अंधूक दिव्यांच्या रस्त्यापासून, चिंचेच्या बहरापासून दूर कुठेतरी घेऊन जात होते – कुठेतरी वेगळ्या जगात जे कधीतरी तिच्या हाती येणार होते. तिच्या मनातील जग सर्वव्यापी विशाल होते. तर त्याचे जग तिच्यापुरतेच मर्यादित होते. त्याचे मन तिच्यासोबतच्या सुखीसमाधानी आयुष्याची स्वार्थी स्वप्ने पहात होते. तिच्यापेक्षा तो खूप वेगळा होता. नवचैतन्याने सळसळत्या नयनरम्य वसंतऋतुच्या तुलनेत उकाड्याच्या दमट मरगळल्या उन्हाळ्यासारखा.

    पायरीवर व्यवस्थित बसण्याच्या प्रयत्नात त्याचे ओठ तिच्या उघड्या हाताजवळ आले. त्यावर ओठ टेकविण्याचा मोह क्षणभर त्याला झाला. त्या उघड्या हातावरची आपली नजर न हटविता तो म्हणाला, गौरी, असली खुळचट पुस्तके वाचू नकोस. तुझ्याविषयीच्या वेडेपणातून मी कधीच बाहेर येणार नाही. मोह टाळू न शकल्याने झुकून त्याने तिच्या हातावर ओठ टेकविले.

    त्याच्या ओठांच्या स्पर्शाने ती मोहोरली. शेवटी तीही वीस वर्षांची एक कोवळी तरुणी होती. त्याची प्रेमभक्ती आनंदित करणारी होती. तरीही आपला हात मागे घेत म्हणाली, प्लीज, वसंत, असे काही मला आवडत नाही.

    का नाही? त्याचा आवाज घोगरा होता.

    हे बरोबर नाही आणि शिवाय शेजारीपाजारी नेहमीच खिडकीतून डोकावीत असतात.

    ‘बरोबर आणि चूक’ या आदर्शापासून ‘शेजारी पाहतील’ या वास्तवापर्यंत झालेला तिच्या विचारांचा प्रवास अचानकच तिच्या विनोदी मनाला भावून गेला. डोके मागे झुकवून ती मोठ्याने हसली. तिच्या बोलण्याने व हसण्याने तो अवघडला; पण काही क्षणांनंतर तोही त्या हसण्यात सामील झाला. तरीही तो गंभीरच होता. डोके खाली झुकवून हातांतील नव्या रुमालाची घडी उलगडत तो बसून राहिला.

    काही क्षणांनंतर, गौरी, तुझ्याविषयी मला काय वाटते हे फक्त मलाच माहीत आहे. काही मुले सुरुवातीला मुलींवर अक्षरश: मरतात पण नंतर त्यातून बाहेरही येतात. पण मी तसा नाही. तुला पाहिलेल्या दिवसापासून मी दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे ढुंकून पाहिले नाही. तुझ्या त्या पुस्तकात काहीही लिहिले असले तरी प्रेमाच्या वेडेपणातून बाहेर न येणारेही काही लोक आहेत आणि मी त्यांच्यापैकी एक आहे. त्याच्या आवाजात जिद्द होती; कारुण्य होते. तो असाच आहे हे गौरीला माहीत होते. तिच्याठायी असलेल्या हजरजबाबीपणा, चातुर्य व विनोदबुद्धी या गुणांचा तो प्रशंसक होता. स्वत:मध्ये या गुणांची वानवा आहे ही जाणीवही त्याला होती आणि म्हणूनच हे गुण आपल्याठायी असावेत याची अल्पशी आसही त्याच्या नजरेत तिला दिसे. हातांतील रुमालाशी अस्वस्थपणे चाळा करीत वसंत पुढे म्हणाला, गौरी, आपण मोठे झाल्यावर कधीतरी तू माझ्याशी विवाह करण्यास तयार होशील, अशी मला आशा वाटते. मी नेहमीच तुझ्याशी चांगले वागेन. तुझी काळजी घेईन.

    गौरीच्या मनात आले की, आपण त्याच्याशी विवाह केला, तर त्याची निस्सीम भक्ती व कारुण्य आपल्याला मिळेल. तो नेहमीच आपल्या गरजेला आपल्याजवळ असेल; सतत प्रेमार्द नजरेने आपल्याकडे पहात राहील. कायम सोबत राहील. कदाचित फार काबील सहचर होऊ शकला नाही, तरी निरंतर विश्वासू मात्र नक्कीच असेल. आजपर्यंतच्या तिच्या छोट्या आयुष्यात तिने जाणूनबुजून कधीच कोणाला दुखावले नव्हते. ती अजाण होती. शल्यक्रियेच्या सुरीने क्षणभर जखम झाली, तरी अंतिमत: ती भल्यासाठीच असते हे तिला अजून कळलेले नसल्याने, त्याला त्वरित नकार देणे तिच्या जीवावर आले. म्हणूनच ‘नाही’ हा शब्द ती स्पष्ट उच्चारू शकली नाही; पण वेळ मारून नेण्यासाठी ती म्हणाली, पण, एवढ्यातच या गोष्टीचा विचार करण्याची गरजच काय? त्याला अजून खूप अवकाश आहे. काही काळ आपण नुसते मित्रच नाही का राहू शकत?

    पण आपण जसे आहोत त्यात मी समाधानी नाही.

    का, वसंत?

    समाधानी नाही, बस्स. तो म्हणाला. मग जिद्दीने पुढे म्हणाला, तू खूप आकर्षक आहेस. दुसरा कोणी मुलगा तुझ्याकडे रोखून पहात असताना त्याच्या चेहऱ्यावर ठोसा लगावण्याची इच्छा होते; पण मला तसा काहीच अधिकार नाही.

    त्याच्या या बोलण्याने धक्का बसलेली गौरी जोरातच ओरडली, आणि तो अधिकार तुला नाही हीच चांगली गोष्ट आहे.

    क्षणभर दोघांमध्ये एक विचित्र शांतता पसरली. पत्नीबाबतचे कर्तव्य म्हणून येताजाता सर्वांना ठोसे लगावणाऱ्या वसंतला पोलीस पकडून नेत आहेत, असे एक मजेशीर दृष्य गौरीच्या नजरेसमोर येत होते. तर मनातील गोष्ट बोलून टाकल्यानंतरची सुटकेची भावना व तिच्या निरुत्साही प्रतिसादामुळे झालेली निराशा यांमध्ये वसंताचे मन हिंदोळे घेत होते.

    रस्त्यातून येता-जाता माझ्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक पुरुषाला त्रास देण्यासाठी वा त्यांना ठोसे लगावण्यासाठी जर तू माझी परवानगी मागत असशील तर –

    हा सगळा विनोदी मामला वाटतो का तुला?

    पुढे झुकून हळुवारपणे त्याच्या दंडावर हात ठेवीत ती म्हणाली, वसंत, मी तुला दुखवू इच्छित नाही; पण एवढ्यातच मला गुंतून घ्यायचे नाही. आताच लग्नाचा विचार करण्याची माझी इच्छा नाही. त्याआधी करण्यासारख्या, पाहण्यासारख्या व बनण्यासारख्या बऱ्याच गोष्टी या जगात आहेत.

    कुठे? कडवटपणे त्याने विचारले. या रस्त्यावर? या घरात? आईच्याबदली हातशिलाई करण्यासाठी तुला आणखी वेळ हवा आहे? का वसुधामावशीची नोकरानी बनून रहायचे आहे? का भाडेकरूला टॉवेल व उशाचादरी पुरविण्यासाठी जिन्याने चढ-उतार करायची आहे? माझ्याशी लग्न कर आणि तुझी सगळी काळजी मला घेऊ दे.

    चंद्रप्रकाशात चमकणाऱ्या केसांमुळे तो एकदम बालकासारखा दिसत होता. परत एकदा तिची विनोदबुद्धी उसळून आली. तिच्या मनात आले, नुकतेच त्याने दिलेले महान आश्वासन पेलण्यास हा बालबुद्धी सक्षम तरी आहे का? त्याच्या केसांत पडलेली चिंचेची काही पाने हाताने काळजीपूर्वक बाजूला काढीत ती म्हणाली, हे बघ वसंत, काही काळ माझी काळजी मला स्वत:च घेऊ दे. मी माझे आयुष्य कधी जगलेच नाही. तुला समजते आहे ना मी काय म्हणते ते? मी दु:खी नाही; पण आयुष्यात मला काहीतरी बनायचे आहे. काहीतरी करायचे आहे आणि एक दिवस मी ते करीनच. जे करीन ते कदाचित फार मोठे नसेल – मला माहीत आहे मी फार मोठे काही करू शकणार नाही – पण काहीतरी उपयुक्त नक्कीच करीन. मग खूप खूप वर्षांनी – जर तेव्हाही मी तुला हवी असेन तर – मी तुझ्याकडे परत येईन.

    पण केव्हा?

    ते मी आत्ताच कसे सांगू? पण खूप काळ लागेल एवढे नक्की.

    दीर्घ श्वास घेऊन वसंत उठला. त्या उन्हाळी रात्रीची सगळी मजाच निघून गेली होती. गरीब बिचारा. त्याने रस्त्याकडे पाहिले. त्याच रस्त्यावरून गौरीची मैत्रीण जया नागेशसोबत आनंदात गेली होती. जयाच्या मनात त्याचे काय स्थान आहे याविषयी नागेशला निश्चिती होती. जया नागेशशी लग्न करील किंवा करणारही नाही; पण गौरीप्रमाणे ‘काहीतरी करायचे आहे.’ असे ती कधीच म्हणणार नाही. पण गौरी जयासारखी नाही. तिला तर आपण हातही लावू शकत नाही. फक्त तिच्या हातावर ओठ टेकविले तरी तिने हात मागे घेतला होता. त्या आठवणीसरशी तो थरथरला. म्हणाला, मी नेहमी तुझीच आशा करीत राहीन. फक्त तुझीच. पण तू मात्र माझ्याकडे कधीच परत येणार नाहीस.

    त्या दोघांना एक गोष्ट कळली नव्हती, की, इतक्या दु:खीमनाने दोघे विचार करीत असलेले तिचे ते ‘संभाव्य’ परत येणे, हे पूर्णता तिच्या ‘तथाकथित’ दूर जाण्यावर अवलंबून होते. मुळात स्वत:चे आयुष्य स्वत: जगण्यास गौरी स्वतंत्र असणे, ही शक्यताही त्या उन्हाळी रात्री खूप दूरची गोष्ट होती. ओळीने असलेली गल्लीतील घरे ज्यामुळे सुरुवातीला दुभंगून नंतर एकत्र आल्यासारखी वाटत त्या दक्षिणोत्तर रस्त्याने तिला वेढून बांधून टाकले होते. त्या घरात तिचा जन्म झाला होता. ती जशी त्या घराची होती तसेच ते घर तिचे होते. त्या घराची फरशी तिच्या हातांनी झाडूनपुसून साफ केलेली होती; कुंपणाचा पांढरा रंग तिच्या हाताने दिलेला होता; त्यावर गारवेल व्यवस्थित चढविण्यासाठी तिच्या हातांनी सुतळ्या बांधल्या होत्या. आपल्या कोमल पण दणकट हातांनी ही सगळी कामे करणाऱ्या गौरीला पाहून शिलाईमशीनवर काम करताकरता वसुधामावशीनेही कुरकुरतच, गौरी कामसू आहे. असे कबूल केले होते. शिलाईमशीन चालविण्याएवढी सशक्त नसल्याने हातशिलाई करीत असलेली तिची आई हातांतील कापडावरचे लक्ष थोडावेळ हटवून म्हणाली होती, मोठी गुणी पोर आहे माझी.

    पदपथावर उभ्या असलेल्या वसंताने, गौरीला कवेत घेण्याचे आपले स्वप्न, अनिश्चित भविष्याच्या अनंतात विरून जाताना पाहिले. तरीही जिद्दीने तो म्हणाला, मी तुझी आशा सोडणार नाही. तू जेव्हा परत येशील तेव्हा मी तुझी वाट पहात इथेच असेन. कथित विरहाचा धक्का संपल्यावर व गोष्टी फक्त पुढे ढकलल्या गेल्यात, असे कळल्यावर त्याने आपले दु:ख थोडे नाटकीपणे व्यक्त केले. धसमुसळेपणेच पँटच्या खिशात हात घालून, नजर खाली करून तो रस्त्यावरून चालू लागला.

    एवढ्यातच त्याला नजरेच्या टप्प्यात अंधारात काहीएक हालचाल दिसली. त्या हालचालीमागे धावतच तो जोरात ओरडला, च्यायला. हा तर चिंटू, गौरीचा ससोबा. गौरी, चिंटू इकडे रस्त्यावर आला आहे. मी पकडण्याचा प्रयत्न करतो. तू पक्याच्या कुत्रीकडे लक्ष दे.

    यावेळपर्यंत गौरीही पळू लागलेली होती. दोघेही मग चिंटूला पकडण्यासाठी धावू लागले. त्यांना पाहून चिंटू घुटमळला. बावचळून नाराजीने ओरडला; पण शेवटी तो गौरीच्या हाती लागला. ये चिंट्या. गौरी ओरडली. करंटा कुठला. सगळीकडे एवढी कुत्री माजलीत. इथे तर खायला काही नसताना तू कुठे चाललास?

    खिशात हात घालीत वसंत म्हणाला, अरे हो विसरलोच होतो मी. हे घे चिंटूसाठी गवत व शेंगा आणल्यात.

    त्या दोघांमधील संध्याकाळची विरही दु:खी घटना चिंटूच्या पळापळीने थोडी मागे पडली. वसंताला वाटले, अजून कित्येक वर्षे गौरी आपल्याशी लग्न करणार नाही; पण कधीतरी करेन असे निदान आश्वासन तर तिने दिले होते.

    एखाद्या उन्हाळी संध्याकाळी तुम्ही एकवीस वर्षांचे असता आणि जेव्हा तुमचे अनंत आयुष्य तुमच्या नजरेसमोर असते; तेव्हा काही वर्षे वाट पाहणे मुळीच अवघड नसते.

    गौरीने आपल्या उबदार हातांत छोट्या चिंटूला धरले होते. वसंतकडे पहात स्मित करीत ती म्हणाली, शुभरात्री, वसंत.

    शुभरात्री. गौरी, आता आपण वचनबद्ध झालोच आहोत तर ‘शुभरात्रीचे चुंबन’ तू मला देणार नाहीस का? त्याने विचारले.

    ती घुटमळली, लाजली. तिच्या गालावर लाली चढली; पण तिच्या त्या घरातच काय पण त्यांच्या गल्लीतही ‘चुंबन’

    Enjoying the preview?
    Page 1 of 1