Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

दाहक अपराध
दाहक अपराध
दाहक अपराध
Ebook363 pages2 hours

दाहक अपराध

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

मध्य आणि पश्चिम ज्युटलॅंड भागात काम करणार्‍या जोहान बोज या पोलिस अधिकार्‍याचा मार्च महिन्यातील एका अपरात्री भरधाव कारने धक्का दिल्यामुळे मृत्यु होतो. गुन्ह्याच्या जागेवर येऊन पहिला तपास करणारी व्यक्ती असते त्याचा बॉस ॲलेक्स बोर्ग. ही फक्त एक सामान्य अपघाताची केस नसून निर्घृणपणे केलेली हत्या आहे हे त्याच्या तिथे पोचल्यावर त्वरित लक्षात येते. बोजच्या नऊ वर्षाच्या मुलाच्या मते धक्का दिलेल्या कारमधील व्यक्तीने पोलिसांचा गणवेश घातलेला त्याने पाहिलेला असतो. हे त्याच्या धक्का बसलेल्या मनस्थितीतील कल्पनेचे खेळ असू शकतात का? पण पेट्रोल पंपावरील व्हिडीओ फूटेजवरून मुलगा खरं बोलतोय हे नक्की होतं. त्या भयानक रात्री ती कार चालवणार्‍या माणसाने पोलिसांचाच गणवेश घातलेला असतो. पोलिस तक्रार आयोगातील गुन्हे निरिक्षक रोलॅन्डो बेनितो याची या केसच्या कामावर नेमणूक करण्यात येते. इतकं भयानक कृत्य करण्यामागे जोहान बोजच्या कुठल्या सहकार्‍याचा नक्की काय हेतू असावा? पूर्व ज्युटलॅंडमधील टी.व्ही.२ या चॅनेलवरील महिला पत्रकार ॲन लार्सन हिची या केसच्या तपासासाठी मदत घ्यायची रोलॅन्डो बेनितो ठरवतो. काही वर्षांपूर्वी एका आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या स्थानिक कुटुंबाच्या घटनेशी याचा काही संबंध असेल का हे पहायचं ते ठरवतात. नक्की ती आग म्हणजे केवळ अपघातच होत का? वरवर वाटतंय त्यापेक्षा खूप काहीतरी वेगळा हेतू या हत्येमागे असावा असा संशय ॲन आणि रोलॅन्डोला असतो. गुन्हेगाराने पुन्हा असंच काहीतरी कृत्य करण्याच्या आधी त्याला पकडण्यासाठी शोध सुरू होतो.
Languageमराठी
PublisherSAGA Egmont
Release dateNov 26, 2019
ISBN9788726232097
दाहक अपराध

Read more from – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

Related to दाहक अपराध

Related ebooks

Reviews for दाहक अपराध

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    दाहक अपराध - – इंगर गॅमेलगार्ड मॅडसेन

    purchaser.

    दाहक अपराध

    प्रकरण १

    त्याने कारचं इंजिन बंद केलं आणि गॅरेजमधे शांतता पसरली. त्याला लागलेल्या धापेचा आवाज ती शांतता पोखरत होता.

    गाडीच्या दिव्यांच्या उजेडामुळे त्याच्या कामाच्या टेबलवर प्रकाश पसरला. तिथे सगळा पसारा तसाच पडला होता.बहुतेक लुकासने परत त्याच्या पक्षीघराचं बांधकाम करून आवराआवर केली नव्हती. सगळीकडे लाकडाच्या तुसांचा धुरळा होता आणि भिंतीवरच्या अवजारांमधून करवत गायब झालेली दिसत होती. त्याच्या मुलाने पुन्हा एकदा हातातलं काम अर्धवट सोडलं होतं. पण टी.व्ही.आणि कॉम्प्युटरसमोर वेळ वाया घालवण्यापेक्षा त्याने निदान काहीतरी करायचा प्रयत्न केलेला बघून त्याला हायसं वाटलं. नऊ वर्षांच्या मुलांमध्ये कसं कायम एक सळसळतं चैतन्य दिसायला हवं, पण त्याला खेळही आवडायचे नाहीत. तो मियासारखा नव्हता. ती आठवड्यातून दोनदा हॅंडबॉलचा सराव करायला जात असे. अर्थात ती त्याच्याहून थोडी मोठी होती, त्यामुळे जसजसा मोठा होईल तशा त्याच्याही सवयी बदलतील अशी त्याला आशा होती.

    त्याच्या बोटांमधलं कौशल्य आणि त्याची नीटनेटकेपणाची आवड त्याच्या मुलामध्ये न उतरलेली बघून त्याला अपार खिन्नता आली. सगळ्या अवजारांचा आराखडा किंवा बाह्यरेखा त्या दोघांनी भितींवर एकत्रितपणे चितारल्या होत्या, त्यामुळे भिंतीवरची करवतीची जागा ओळखणं अजिबात कठीण नव्हतं. त्याच्या पोटात कालवाकालव झाली आणि छातीत धडधडायला लागलं.

    राग आणि चिडचिड शांत करण्यासाठी स्टीअरिंग व्हीलवर हात ठेवून डोकं सीटला टेकवून तो काही काळ तसाच सुन्न बसून राहिला. प्रश्न ना करवतीचा होता, ना पसार्‍याचा ना लुकासचा.

    त्याला आलेलं वैफल्य आणि त्याने निवडलेले चुकीचे पर्याय हे सगळ्या समस्येचं मूळ होतं. त्याने स्वतःला सावरून वेळीच सगळं ॲलिसला सांगितलं असतं, तर त्यावेळी ते सगळं घडलंच नसतं. तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकतेय याचा अंदाज त्याला यायला लागला होता. जेव्हाजेव्हा तो उशिरापर्यंत काम करत बसे किंवा त्याला कॉन्फरन्ससाठी देशाबाहेर जावं लागे, तेव्हा तिच्या मनातला संशय जास्तच बळावलेला त्याला जाणवायचा. तिला सगळं कळलं होतं पण तिने अद्याप तोंड उघडलं नव्हतं. खरंच तिचं त्याच्यावर ‘इतकं’ प्रेम होतं की, त्याच्यापेक्षा अजून चांगला तिला कुणी मिळू शकत नाही असं तिला वाटत होतं? ती दिसायला सुंदर होती त्यामुळे तिला तिच्या आवडीनुसार कुणीही मिळू शकला असता.

    त्याने डोळे उघडले आणि तो अंधारात बघत राहिला. परपुरुषाबरोबर ॲलिस या केवळ विचारानेदेखील त्याच्या डोक्यात मत्सराची तिडिक उठली. आपण किती नीच माणूस आहोत हे त्याला स्वतःला जाणवायला हा एक विचार पुरेसा होता. घरासमोरून जाताना त्याला दिवे बंद दिसले, याचा अर्थ ॲलिस आणि मुलं झोपली होती, त्यामुळे त्याला उगीचच हायसं वाटलं. पण ना त्याला हायसं वाटून घ्यायचा अधिकार होता ना मत्सर वाटून घ्यायचा. अर्थात ते सगळेजण झोपले होते. मुलांना सकाळी लवकर उठून शाळेत जायचं होतं आणि ॲलिसला हॉस्पिटलमधे पहाटेची शिफ्ट होती. कदाचित लवकर झोपायला जाणे ही निषेध नोंदवायची तिची पद्धत असावी.

    त्याने घरी फोन करायला हवा होता, काहीतरी नक्की घडलं होतं. उद्या त्याला कळणार होतं.

    उद्या तिच्याशी नजरानजर झाल्यावर त्याची खैर नव्हती. इतकी वर्ष गेल्यावर आता तरी त्याने मनातून काढून टाकायला हवं होतं. तो एक अपघात होता, अहवालामध्ये तशी नोंददेखील होती. पण त्याला कायमच ते अपघातापेक्षा वेगळं काहीतरी असल्याची संशय होता. ते त्याच्या व्यवसायामुळे असावं की अजून वेगळं काही कारण होतं? तुला काही खुपतंय किंवा कशाचा काही त्रास होतोय का हे ॲलिसने त्याला विचारुन झालं होतं. मायाळू स्वभाव आणि तीव्र निरीक्षणशक्तीमुळे तिलाही त्याची अस्वस्थता जाणवत होती त्याने लपवलेलं दुःख आणि ती आणि मुलं सोडून इतर अनेक गोष्टींचे त्याला सतावणारे विचार तिच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते. त्याने वेळीच सगळं तिला प्रामाणिकपणे सांगितलं असतं, कबूल केलं असतं तर या सगळ्यातून सुटका होऊन त्याचा आत्मा थंड झाला असता आणि शांतपणे त्याला जगता आलं असतं. पण आता जर तर चा काहीच उपयोग नव्हता. कशानेच काही फरक पडणार नव्हता.

    त्याने आवंढा गिळला आणि तर्जनी आणि अंगठ्याने जोरात नाक दाबून अतिव कष्टाने रडण्याचा कढ आवरला. तिच्यासाठी त्याच्या हृदयात विशेष जागा होती आणि आता त्याची खात्री झाली होती की त्याचं खरंच तिच्यावर जीवापाड प्रेम होतं. इतरांबरोबर असायचं तसं ते फक्त शारिरीक आकर्षण किंवा वासना नव्हती. किंवा इतरांसारखा तो निव्वळ टाईमपासही नव्हता ज्याबद्दल सर्व माहित असूनही काहीच माहित नसल्याचा आव ॲलिस आणत होती. तारुण्य किंवा सौंदर्याने त्याला एकदाही अशी भूरळ घातली नव्हती. हे काहीतरी वेगळंच होतं, काहीतरी खूप जिव्हाळ्याचं आणि शब्दांमध्ये मांडता न येणारं. मानसिक आणि शारिरीक स्तरावर तो अशाप्रकारे आत्तापर्यंत कुठल्याच स्त्रीबरोबर एकरुप झाला नव्हता. अगदी ॲलिसबरोबर देखील नाही.

    शेजार्‍यांचा कुत्रा भुंकायला लागला. त्याने स्वतःला सावरलं आणि कारचा दरवाजा उघडला. कारचं दार आपटल्याचा आवाज गॅरेजमध्ये घुमला. बाहेर पडताच नेमका त्याचा पाय खिळा बाहेर आलेल्या लाकडाच्या फळीवर पडला आणि त्याने मनातल्या मनात शिव्यांची लाखोली वाहिली. दिवा लावून त्याने ती फळी उचलून टेबलवर ठेवली.

    लुकासने पक्षीघराचं काम बर्‍यापैकी पूर्ण करत आणलं होतं. त्याने सगळीकडून ते एकदा तपासून पाहिलं छताचा एकीकडचा भाग थोडासा तिरका झाला होता आणि एक खिळा थोडासा बाहेर डोकावत होता, पण तेवढं सोडलं तर बाकी सगळं त्याला जमलं होतं. त्याच्या चेहर्‍यावर उदास हास्याची रेषा उमटली आणि त्याने त्याचे डोळे पुसले. उद्या ते घर पूर्ण करायला त्याला मदत करायचं त्याने ठरवलं.

    त्याने तिच्यापासून सगळं लपवून ठेवण्याचं मुख्य कारण होतं ते त्याची मुलं. लुकास आणि मिया. त्यांच्याशिवाय राहणं त्याला जमलं असतं का? आणि तसं करण्याची खरंच गरज पडली असती का? तिने त्यांनाही तितकंच आपलंसं केलं असतं, त्याला खात्री होती. तिला तिची स्वतःची मुलंदेखील होती. या मुद्यावरून त्याच्या मनात पुन्हा एकदा केसचे विचार घोळायला लागले. मधेच रात्री अचानक परत आला तेव्हा टोर्बनला माझ्या हातात तो अहवाल दिसला नसला म्हणजे मिळवलं. असे छोटेमोठे तपशील त्याच्या नजरेतून सुटत नसत. म्हणूनच एक सक्षम पोलीस अधिकारी म्हणून त्याची ख्याती होती. उभा रहात खुर्चीवर टाकलेला कोट उचलून त्याने निघण्याचा पवित्रा घेतला ज्यावरून तो नेहमीसारखा घरी निघतो आहे असं वाटावं. त्याचं वागणं संशयास्पद वाटलं नसावं अशी तो आशा करत होता.

    त्याने कारचा डाव्या बाजूचा मागचा दरवाजा उघडून जॅकेट आणि बॅग घेतली आणि जॅकेट खांद्यावर टाकत गॅरेजमधून बाहेर पडला. ती मार्च महिन्यामधली त्यामानाने उबदार संध्याकाळ होती. आकाशात तारे चमकत होते आणि समुद्रकिनार्‍यावरच्या कुंपणावरची वाळलेली पानं वार्‍यावर सळसळत होती.

    शेजार्‍यांचा कुत्रा, मॅक्स अजूनही भूंकत होता. खरं तर तो ओळखीचा असल्यामुळे कुंपणाभोवती फिरताना तो कुत्रा आत्तापर्यंत त्याच्यावर कधीही भुंकला नव्हता. त्याने रस्त्याकडे पाहिलं. शेजार्‍यांच्या घरासमोर रस्त्यावरच्या दिव्यांपासून काही फूट अंतरावर एक कार पार्क केलेली दिसत होती. गडद रंगाची प्युजॉ २०८ पण ती पाहुण्यांची वाटत नव्हती कारण खिडकीत दिवे दिसत नव्हते. मॅक्स घरात एकटा आहे की काय? कुत्र्याशी थोडं बोलून त्याला शांत करावं असाही एक विचार त्याच्या मनाला चाटून गेला. पलंगावर जाऊन ॲलिसशेजारी आडवं पडण्याआधी त्याला स्वतःसाठी अजून थोडा वेळ मिळाला तर हवा होता. घरी यायला उशीर का झाला याची कारणं त्याला तिला द्यायची नव्हती. किंवा कदाचित त्याच्याकडे पाठ करून ती अंधारात बघत आडवी पडली असण्याचीही शक्यता होती. तो रात्री उशिरापर्यंत काम करणार आहे हे त्याने तिला सांगितलंही नव्हतं किंवा तिने अनेक वेळा केलेल्या फोन कॉल्सनाही त्याने उत्तर दिलं नव्हतं.

    ती अंधारात पार्क केलेली कार त्याच्याकडे बघून मिश्किलपणे हसतेय असा त्याला भास झाला. त्यालाही थोडं हसू आलं. कार्सकडे त्या नजरेतून पहायला त्याला लुकासने शिकवलं होतं. त्याच्या मुलाला कारच्या मॉडेल्समधे अनेक वेगवेगळे चेहरे आणि कार्टून्स दिसायची. त्याची कल्पनाशक्ती जबरदस्त होती. त्याच्याकडे बघून कधी कार्स गोड किंवा मिश्किलपणे हसायच्या किंवा कधी फुरंगटलेल्या किंवा रागावलेल्या दिसायच्या. कारचे दिवे म्हणजे डोळे आणि रेडिएटर ग्रील म्हणजे तोंड आणि दात असं म्हणून लुकासने त्याला बघायला शिकवलं होतं.

    ही कार शेजार्‍यांकडे नेहमी येणार्‍या पाहुण्यांची वाटत नव्हती. शेजारी राहणार्‍या वृद्ध जोडप्याकडे फारसं कुणी फिरकत नसे. ड्रायव्हिंग सीटवर कुणीतरी असल्यासारखं भासत होतं. त्याने डोळे किलकिले करून पाहिलं. रस्त्यावरच्या अंधूक प्रकाशात त्याला एक काळी आकृती दिसली.

    काही दिवसांपूर्वीच दरोड्याचे नियोजन म्हणून घरांचे परिसर धुंडाळत फिरणार्‍या एका टोळीचा त्यांनी पर्दाफाश केला होता. तो गाडीच्या दिशेने चालू लागला. अचानक सुरू झालेल्या कारच्या प्रखर दिव्यांनी त्याचे डोळे दिपले आणि त्याने डोळ्यांवर हात धरला. टायरचा कर्कश्श आवाज करत कार सुरू होऊन त्याच्याच दिशेने आली. त्याला काही कळायच्या आत कारचं रेडिएटर ग्रील त्याच्या गुडघ्याला आणि मांडीला घासून तो हवेत फेकला गेला. आणि मांजरीसारखा मागच्या डांबरी रस्त्यावर आपटला. कशीबशी मान वळवत असताना त्याला लाल दिवे अदृश्य होताना दिसले.

    डांबरामुळे त्याच्या गालाला दुखापत झाली. त्याने उठायचा प्रयत्न केला पण त्याला असह्य वेदना होत होत्या. छोटीशी रक्ताची उलटी होऊन तो जवळजवळ बेशुद्धच पडला. कुत्रा जोरात भुंकून कुंपण ओलांडून त्याच्यापर्यंत पोचायचा आटोकाट प्रयत्न करत होता. अचानक शेवटच्या भिंतीजवळ असलेल्या खिडकीमधले दिवे लुकलुकले.

    ती लुकासची खोली होती.

    त्याने डोळे मिटले, त्याच्या तोंडातून रक्त येत असलेलं त्याला जाणवलं. त्याने हात उचलून ते पुसायचा एक निष्फळ प्रयत्न केला. लुकासने त्याला तशा अवस्थेत बघायला नको होतं. कारच्या आवाजाने पुन्हा एकदा त्याला डोकं वळवून डोळे उघडायला भाग पाडलं. तो रस्त्याच्या मध्यभागी पडला होता आणि कार त्याच्याच दिशेने येत होती. त्याने जिवाच्या आकांताने सरपटत बाजूला व्हायचा प्रयत्न केला पण त्याला जागचं हलताच येईना. त्याने कसाबसा गाडीच्या उजेडाच्या दिशेने हात दाखवत गाडी थांबवायचा प्रयत्न केला. कार भरधाव वेगाने त्याच्यापर्यंत पोचली. त्याला लक्षात आलं की ही तर तीच कार आहे. आता गाडीचा पुढचा टायर त्याच्या इतका जवळ आला होता की त्याला त्यावरची नक्षीदेखील दिसली. आणि उरल्यासुरल्या शक्तिनिशी त्याने जिवाच्या आकांताने शेवटची किंकाळी फोडली.

    ###

    पोलीस इन्स्पेक्टर ॲक्सेल बोर्गने सुनावणीच्या वेळी आपले अश्रु आवरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. भोंगा न वाजवत रुग्णवाहिकेतून फॉरेन्सिकला आत्ताच नेलेली व्यक्ती त्यांच्यातलीच एक होती. भोंग्याची गरज नव्हती. कारण आता कसलीच घाई नव्हती. नाईलाजाने त्याने रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या थारोळ्याकडे पाहिलं. तिथे पांढरा कोट घातलेले पोलीस खात्यातले लोक काहीतरी क्रमांक असलेले पिवळे त्रिकोण ठेवत होते. ती पत्त्यांच्या पिरॅमिडची सुरुवात असल्याचा भास होत होता. तेवढ्यात त्या पोलीस तंत्रज्ञाने रस्त्यावर पडलेलं काहीतरी चिमट्यामध्ये उचललं. ते काय असू शकतं याबद्दल त्याला विचारही करावासा वाटत नव्हता. डांबराच्या ढीगापर्यंत ओघळत गेलेल्या रक्ताच्या थारोळ्यापुढे टायर घासल्याच्या खूणा दिसत नव्हत्या याची त्याने नोंद केली.

    तंत्रज्ञाने त्याच्याकडे बघून होकारार्थी मान हलवली आणि टायरच्या चिखलाच्या अगदी पुसट खूणांसमोर ठेवलेल्या ५ आकडा लिहिलेल्या पिवळ्या त्रिकोणाचे फोटो काढले. आजुबाजूला लांब पाहिल्यावर ॲक्सेलच्या लक्षात आलं की त्या चिखलाच्या खुणा नव्हत्या. गडद राखाडी रंगाच्या लोकरीच्या कोटाच्या खिशातून त्याने आपले हात बाहेर काढले आणि घराकडे पाहिलं. त्याच्या गळ्यात आलेला आवंढा त्याने गिळला. अशावेळी कुटुंबांशी बोलणं म्हणजे सत्त्वपरीक्षा असते.

    पण त्याला तशी गरजच पडली नाही. त्यांच्या खात्यात नव्यानेच रुजू झालेली महिला पोलीस अधिकारी कतजा हिला हे काम चांगलं जमत असे, तिने आधीच ते काम पार पाडलं होतं. अगदी अलिकडेच नोकरीला लागल्यामुळे तिचा जोहानशी फारसा परिचयदेखील नव्हता. पण ॲक्सेल ॲलिसला ओळखत होता. ऑफिसच्या ख्रिसमस पार्टीला त्यांनी एकत्र डान्स केला होता त्याला जेमतेम चार महिने होत होते. जोहानने डान्स केला नव्हता. खरं सांगायचं तर हाही धड नाचला नव्हता पण ॲलिस इतकी आकर्षक होती की तिच्यापासून लांब राहणं कठीण होतं. त्याला तिची एकदम दया आली. जोहान हा प्रामाणिक नवरा नव्हता हे ऑफिसमध्येही सगळ्यांना ठाऊक होतं. ॲलिसला त्याची कल्पना होती की नाही देव जाणे. पण आता त्याने काय फरक पडणार होता? एकदा माणूस गेला की त्याच्या कुठल्याच गोष्टींना काहीच संदर्भ उरत नाही.

    जड पायाने त्याच्या घराच्या दगडी पायर्‍या चढत त्याने दारावरची बेल वाजवली. त्याच्या बुटाखाली पायर्‍यांवर असणारी वाळू चरचरली. दारावरच्या बेलचा आनंदी सूर तिथल्या वातावरणाशी अगदीच विसंगत वाटत होता. ओक लाकडाच्या जड दाराआडून त्याला काहीतरी कुजबूज ऐकू आली आणि आपल्या बोटांनी दाढी कुरवाळत तो दार उघडण्याची वाट बघत राहिला. दाढी लांब वाढल्यापासून, अस्वस्थ असताना ती कुरवाळत राहायची सवय त्याला लागली होती. पण त्यामुळेच संध्याकाळच्या कॉफीबरोबर खाल्लेल्या डॅनिशचे कण दाढीत अडकले नसल्याची त्याची खात्री झाली. ही तीच वेळ जेव्हा त्याला ही वाईट बातमी देण्यासाठी ड्युटी ऑफिसरचा फोन आला.

    त्याने घड्याळात पाहिलं. १:१५. कतजा कदाचित निघून गेली असावी आणि ॲलिसलाही धक्का बसला असेल, त्यामुळे जरा थांबावं असं त्याला वाटलं. कदाचित ती झोपलीही असावी. परत बेल वाजवायची त्याची हिंमत झाली नाही. ही वेळ जितकी पुढे ढकलता येईल तितकं बरं असा विचार करत सुटकेचा निःश्वास टाकत तो गाडीकडे परत जायला वळला, तितक्यात त्याला दार उघडल्याचा आवाज आला. रडल्यामुळे ॲलिसचे डोळे सुजून लाल झाले होते आणि तिचा खालचा ओठ थरथरत होता. तिने काहीही मेकअप केला नव्हता. ख्रिसमस पार्टीमध्ये मेकअपमुळे ती सुपरमॉडेल दिसत होती. मेकअपमुळे काही बायकांचं सौंदर्य खूपच खुलून येतं पण ती खरंतर त्याच्याशिवायच जास्त चांगली दिसत होती.

    दार उघडून काहीही न बोलता ती आत निघून गेली. घरातल्या पजामामध्येही ती छान दिसत होती. तिने तिच्या तपकिरी रंगाच्या कुरळ्या केसांचा पोनिटेल घातला होता. मुलांना जवळ घेऊन ती कोचावर बसली. मुलगी मिया रडत होती पण मुलाला मात्र चांगलाच धक्का बसल्याचं जाणवत होतं. ते ही झोपायच्या कपड्यातच होते. मुलीने गुलाबी रंगाचा फुलांची नक्षी आणि लेस असलेला ड्रेस घातला होता तर मुलगा पजामामध्येच होता. टॉपवर किती प्रकारचे डायनॉसर प्रिंट केले आहेत हे मोजण्यात ॲक्सेलचं लक्ष विचलीत झालं.

    त्याने घसा खाकरला.

    झालं हे खूपच वाईट झालं. ॲलिस, मला माफ कर, घोगर्‍या आणि दु:खी स्वरात तो म्हणाला.

    ॲलिसने होकारार्थी मान हलवली. तिच्या थरथरणार्‍या ओठातून हलक्या आवाजात आभार उमटले.

    तो कोचासमोरच्या आरामखुर्चीवर बसला. कोचावर ते तिघंही भेदरून एकमेकांना बिलगून बसले होते. ॲलिसने मुलाला घट्ट जवळ ओढून घेतलं आणि ॲक्सेलकडे पाहिलं. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता.

    तुला....., घसा खाकरत तिने विचारलं, तुला काही कळलं का? कोण होता तो?

    त्याने नकारार्थी मान हलवली.

    नाही, अजून काहीच कळलं नाही. त्याला शोधणारा मी नसेन.

    तू नाही शोधणार? पण मग कोण.... तिने गोंधळलेल्या चेहर्‍याने त्याच्याकडे पाहिले.

    आमचे नियमच तसे आहेत ॲलिस. आमच्याच खात्यातल्या लोकांच्या बाबतीत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याची आम्हाला परवानगी नसते.

    पण मग त्या ड्रायव्हरला शोधणार कोण? जोहानला तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण ओळखत होतं?

    तोच तर मुद्दा आहे. जोहानला मी आणि आमच्या खात्यातले सगळेच खूप जवळून ओळखत होते. त्यामुळे नियमानुसार बाजूच्या हद्दीतलं पोलीस खातं या केसचा तपास करेल.

    हे ऐकून ॲलिसच्या पायातलं त्राणच गेल्यासारखं झालं आणि ती सोफ्यामधे अधिकच रुतून बसली. तिचे पाणावलेले पण भकास डोळे अजूनही त्याच्याकडे रोखलेले होते.

    मला काहीच ऐकू आलं नाही, मला तो घरी आल्याचादेखील आवाज आला नाही. आम्ही सगळे झोपलो होतो आणि...

    स्वतःला दोष देऊ नकोस, ॲलिस

    इतक्या उशिरापर्यंत तो काय काम करत होता?

    म्हणजे तो कामावरून आला असं वाटतंय तुला?ॲक्सेलच्या तोंडून हा प्रश्न अनावधानाने बाहेर पडला आणि त्याने जीभ चावली. त्याच्या हाताखाली काम करणार्‍या लोकांवर खरंतर त्याचं फारसं नियंत्रण नव्हतं पण त्याला तसं तिला दाखवून द्यायचं नव्हतं.

    "मला माहित नाही, पण

    Enjoying the preview?
    Page 1 of 1