Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

रक्ताळ शाई (Raktal Shai): झुंज नक्षल चळवळीशी
रक्ताळ शाई (Raktal Shai): झुंज नक्षल चळवळीशी
रक्ताळ शाई (Raktal Shai): झुंज नक्षल चळवळीशी
Ebook796 pages5 hours

रक्ताळ शाई (Raktal Shai): झुंज नक्षल चळवळीशी

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

मानव, एक शोधक पत्रकार, कलकत्ता येथील पोलिस क्रूरता आणि सरकारी भ्रष्टाचाराची अंडीपिल्ली उघडकीस आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच वेळी, नक्षलवाद, एक नवीन मार्क्सवादी-माओवादी चळवळ, पूर्व भारतामध्ये आगी सारखा पसरत आहे. मानव नक्षलवाद्यांच्या संघर्षाशी सहानुभूतिशील आहे, परंतु तो त्यांच्या हिंसा मार्गाशी सहमत नाहीं.

जेव्हा एक शक्तिशाली मंत्र्यांचा खून होतो, तेव्हा मानवाचे शत्रू त्याला मंत्र्याच्या खुनाच्या षडयंत्रात गोवतात. कलकत्यातून फरारी होण्यास भाग पडल्यामुळें मानव परिस्थितीशी जुळवून घेण्यास संघर्ष करतो; तथापि, त्याचा शोधक स्वभाव दडपला जात नाही.

एका बातमीच्या शोधात जेव्हा मानव जंगलात शिरतो, तिथे अकस्मात तो एका माओवादी आणि नक्षलवादींच्या बंडाला सामोरे जातो. तिथली गडद रहस्ये त्याला मुळापासून हादरवितात. जिवंत राहण्यासाठी आणि बंडाला पराभूत करण्यासाठी मानवाला प्रथम आपल्या आयुष्याच्या उद्देश पुन्हा शोधून काढावा लागेल.

Languageमराठी
Release dateApr 13, 2019
ISBN9780463619636
रक्ताळ शाई (Raktal Shai): झुंज नक्षल चळवळीशी

Related to रक्ताळ शाई (Raktal Shai)

Related ebooks

Reviews for रक्ताळ शाई (Raktal Shai)

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    रक्ताळ शाई (Raktal Shai) - Rakesh Bhadang

    रक्ताळशाई

    लेखक

    राकेश भडंग

    www.rakeshbhadang.com

    माझ्या आईवडिलांना, ज्यांनी माझ्या

    विचारशक्तीला नेहमीच मुक्त संचारू दिले...

    सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन

    (C) राकेश भडंग

    ई-मेल: rakesh@rakeshbhadang.com

    website: www.rakeshbhadang.com

    लेखकाची इतर पुस्तके: Amazon मध्ये उपलब्ध

    Bloody Ink

    सैतानाची ख़ुशी(कविता संग्रह)

    आयुष्याचे गाणे(कविता संग्रह)

    मी तथागत आहे,

    सगळ्या मानवातील आदरणीय

    मी प्रगट होतो जगात, या सर्वदायी नभासारखा

    वर्षाव करत पोषक सत्त्वांचा

    सर्व तृषार्त जीवांसाठी

    त्यांना दुःखापासून मुक्त करण्यासाठी,

    आनंद मिळवून देण्यासाठी

    शांततामय आयुष्याचा

    जीवनाचा आणि निर्वाणाचा...

    सगळे माझ्या लेखी सारखे

    जसे मी एकाला समजावेन, तसेच सर्वांनादेखील

    मी कधी थकत नाही

    सढळ हाताने देताना

    या समृध्दिमय, संवर्धक पावसासारखा

    लोटस सूत्र – ५

    काळ्या नभाची बोधकथा

    प्रकरण १

    मानव त्या तरुण नक्षलवाद्यापाठी अंधाऱ्या गल्लीत शिरला. जुन्या कलकत्त्यामध्ये चक्रव्युहाप्रमाणे बनलेल्या बोळींच्या घोटाळ्यात तुरी देण्यासाठी बऱ्याच युक्त्या होत्या, परंतु लपण्यासाठी मात्र फारशा जागा नव्हत्या. असेल ती रिकामी जागा झोपलेल्या कुत्र्यांनी, हातगाड्यांनी व भिकाऱ्यांनी बळकवल्या होत्या.

    गल्लीतील एक-दोन दिवे वगळता बाकी सगळे कोणा उनाड किंवा गुन्हेगार मुलांनी फोडून टाकले होते. उरल्या दिव्यांचा अंधूक प्रकाश सर्वत्र पसरला होता. गल्लीमध्ये सात आठ पिंपे ओळींनी ठेवलेली होती. एखाद्या साठे बाजार करणाऱ्या व्यापाऱ्याचा काळा माल असावा बहुदा.

    इकडे, इथे त्या तरुणाने पिंपाकडे बोट दाखविले. इथे मारले त्यांनी गोनुला. मादरच्योद पोलिस. असे म्हणून तो थुंकला. तो तरुण कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया च्या मार्क्सिस्ट-लेनिनिस्त गटाचा होता ज्यांना नक्षलवादी किंव्हा माओवादी म्हणून ओळखले जायचे.

    सवयीप्रमाणे मानवने आपल्या कुर्त्याच्या खिशातून छोटी टिपणवही व पेन्सिल काढली. एका पिंपावर चढून त्याने पाठीमागे डोकावले. परंतु अंधारामुळे काहीच दिसले नाही. मानव पाठोपाठ तो नक्षलवादी पिंपांपलीकडे उतरला. त्याने खिशातून लायटर काढून त्याच्या अंधुक प्रकाशात जमिनीवर पडलेले रक्ताचे डाग दाखविले.

    इथे लपून बसला होता गोनू, इथं गोळी घातली त्यांनी त्याला.

    हे सकाळी झाले? किती वाजता?

    आज सकाळी. अंदाजे चार वाजता. मी आणि माझे तीन कॉम्रेड माओइस्ट कम्युनिस्ट गटाच्या मिटींग नंतर सेंट्रल स्ट्रिट वर जात असताना पोलिसांनी आम्हाला घेरले. आम्ही त्यांना शिताफीने हुलकावणी देऊन इकडे पळत आलो. परंतु त्यांनी आमची इथे नाकाबंदी केली.

    तू कसा काय निसटलास?

    त्या तरुणाने गल्लीच्या दुसऱ्या दिशेस बोट दाखवले व म्हटले, मी तिकडून पळत आलो आणि बाजूच्या गल्लीत शिरलो. जेव्हा मला लपण्यास जागा दिसली नाही, मी तिथल्या एका भिकाऱ्या शेजारी पहुडलो आणि त्याचे पांघरुण स्वतःवर ओढून झोपेच सोंग केले. सुदैवाने तो चुपचाप राहिला! नक्षलवाद्याने एक दीर्घ श्र्वास घेतला. "नंतर मला लक्षात आले कि तो मेला होता म्हणून त्याने हूं की चू केले नाही. मी गुपचूप पडून राहिलो आणि कांबळीच्या भोकातून पोलिसांवर नजर ठेवून होतो. पॉईंट ३०३ च्या रायफली घेऊन माझा माग काढताना मी त्यांना बघितले. त्यांच्या पाठी एक जाडजूड, ढेरपोट्या इन्स्पेक्टरला पाहिलं. तो हातातपिस्तूल धरून दबकत येत होता. मला वाटले मादरच्योद पोलीस सगळ्या भिकाऱ्यांची झडती घेतील परंतु ते पुढे निघून गेले.

    पाच मिनिटानंतर शेजारच्या गल्लीतून मी कॉम्रेड गोनूची विनवणी ऐकली. मारू नका, मारू नका."

    नंतर ऐकू आले. ए ३०२, मार त्या भडव्याला... आता... साल्या हरामखोरा, गोळी झाड म्हणतो ना!

    त्यानंतर मी ऐकले दोन रायफलीचे बार. तेव्हाच मला समजले नपुंसक व्यवस्थेने दाबला शेवटी त्याचा आवाज. चांगला कॉम्रेड होता गोनू. समर्पित. आता मला कळले आम्हाला शस्त्रे, रायफली मिळवाव्या लागतील. पोलिसांशी झुंजावे लागणार, व्यवस्थेशी..."

    मानवने इकडे तिकडे चौकसपणे बघितले. तू त्याचा मृतदेह हलवताना बघितले का?

    नाही. तरुण उत्तरला. मी त्या मृत भिकाऱ्यापाशी पडून राहिलो आणि पोलीस निघून गेल्यानंतर पळून गेलो. पोलीस माझ्या मागावर होते. त्यांनी माझ्या घरावर, पार्टी ऑफिसवर सगळीकडे पाळत ठेवली होती. रात्र झाल्यावर या गल्लीत येऊन बघतो तर काय फक्त रक्ताचे डाग. बाकी काही नाही. मग मी सरळ तुमच्या शोधात आलो. मला खात्री होती तुम्ही ही बातमी प्रसिद्ध कराल.

    आपल्याला प्रत्यक्षदर्शी हवा. मानव म्हणाला

    मी आणतो साक्षीदार, तुम्ही काळजी करू नका. मी उठवतो सगळ्या भिकाऱ्यांना. कोणीतरी गोनूचा खून होताना बघितलंच असेल. पोलिसांना याची किंमत चुकवावीच लागणार. मादरच्योद पोलिस! तो तरुण पुन्हा एकदा थुंकला. आज दिवस त्यांचे आहेत. लवकरच आमचे दिवस येतील.

    मानवने ठिकाणाची व काही गोष्टींची नोंद केली. त्याने विचार केला, काल मारलेल्या नक्षलवाद्यांचे देह लवकरच नदीपाशी कुठेतरी उगवतील. पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या सामन्यांच्या फार बातम्या येत आहेत माझ्याकडे. एका चांगला साक्षीदार पाहिजे मला. साला, मीच जर बघितली असती चकमक आणि त्याचा फोटोही फोटो मिळाला तर काय – जोरदार मथळा – बेंगाल टाइम्सचे वार्ताहर मानव हे पोलिस-नक्षलवाद्यांच्या चकमकीचे प्रत्यक्ष साक्षीदार.

    तरुणास बातमी छापण्याचे आश्वासन देऊन, मानव घराकडे निघाला. गल्ल्यांच्या चक्रव्हुहातून मार्ग काढत मानव घराकडे निघाला. मुख्यरस्त्या च्या आधी एक पोलीस चेकपॉईंट लागला. पोलिसांनी थांबविल्यावर मानवाने आपले वार्ताहराचे ओळखपत्र दाखविले.

    इतक्या रात्री कुठला वार्ताहर फिरत असतो? काय बातमी मिळवली आहे?

    मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाही.

    मग बस बाजूला. इन्स्पेक्टर साहेब आल्यावर ठरवतील.

    सुदैवाने मानवला ओळखणारा एक पोलीस आला आणि त्याने मानवला जाऊ दिले. दोन ट्राम बदलत, जेव्हा स्वतःला खेचीत तो घरी जाऊन बिछान्यावर पडला, तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. काही तासानंतरच मानवचा घरचा फोन खणखणला.

    हॅलो, कोण आहे?

    कोणी तुला फोन केला होता का? जीवननं फोनच्या दुसऱ्या बाजूनं विचारलं. जीवन म्हणजे ‘बंगाल टाइम्स’ वर्तमानपत्राचा दिवसपाळीचा सूत्रधार. मानव तिथं सहसंपादक होता.

    मला नाही वाटत, कोणी फोन केला होता असं. माझ्या टेलिफोनचा आवाज इतका मोठा आणि कर्कश आहे, की त्यामुळे मला जाग येतेच!

    जीवन खुसखुसत म्हणाला, अगदी माझ्या बायकोच्या आवाजासारखा.

    काय बातमी आहे?

    तू ताबडतोब ऑफिसमध्ये निघून ये.

    का? काय झालं? काय एवढी खास बातमी आहे?

    छे! तसं काही नाही.

    जीवन, मी तुला चांगला ओळखतो. तू मला ‘कलकत्त्यात कम्युनिस्टांचा मोर्चा निघाला’ अशा, नेहमीच्या बातमीनं उठवणार नाहीस. मुळात, तूच एवढ्या लवकर ऑफिसमध्ये का आलास ते सांग मला. मावन हातात टेलिफोन तसाच धरून अर्धवट अंधारात भिंतीपर्यंत गेला आणि त्यानं ट्यूब लावली. त्यानं टेबलावरच्या घड्याळाकडे पाहिलं. त्यावेळी सहा वाजून वीस मिनिटं झाली होती. एवढ्यात, टेलिफोनवरून पलीकडून आवाज आला,

    चल, तू आधी ऑफिसला ये पाहू. मग तुला सारं सांगतो.

    अबे ए! आताच सांग मला. उगाच फालतू वेळ घेऊ नको.

    पण जीवन म्हणाला, मी फोनवर नाही सांगू शकणार.

    का नाही? मला नाही वाटत आपले फोन कोणी टॅप करत असणार. तेवढ्यात, मानवला आपल्या घराच्या दारावर कोणीतरी टकटक केल्याचं ऐकू आलं.

    जीवन, जरा थांब कुणीतरी दाराशी आलंय. कोण दार ठोकतंय या वेळेस, च्या मारी!

    हं, तो सबीर असणार. मीच त्याला तुझ्याबरोबर ऑफिसला यायला सांगितलंय.

    सबीर? आणि माझ्याबरोबर येणार? कशासाठी? मानवचा आवाज कठोर होत गेला आणि टेलिफोनवरील त्याच्या हाताची पकड घट्ट झाली. गृहमंत्री रानक यानं जुने खेळ सुरू केले वाटतं! त्यानं त्याच्या गुंडांना आपलं ऑफिस जाळण्यासाठी तर पुन्हा पाठवलेलं नाही ना?

    नाही, नाही. तसं काही नाही. दारावरची टकटक अधिक जोरात ऐकू येत होती.

    मानवनं रिसीव्हर टेबलावर ठेवला आणि तरातरा जाऊन दार उघडलं.

    सबीर, काय चाललंय? असं काय घडलं, की मला तुझी सोबत आवश्यक ठरली? मानवनं दरवाजा लोटत सबीरला विचारलं. सबीर हा ‘बंगाल टाइम्स’चा जुळवणीकर होता.

    मला ठाऊक नाही. जीवननं माझ्या शेजारी फोन करून मला निरोप दिला, की मी तुला घेऊन ऑफिसला यावं.

    टेबलाशी जाऊन मानवनं परत रिसीव्हर उचलला. सबीर इथं आलाय. पण मला अजून कळत नाही, हा साला घाट आहे काय? लवकर सांग, नाहीतर तुला माहीत आहे की मी विचार करून वेडा होईन.

    मला कळतंय रे! नवीनदांना आणि आम्हालासुद्धा वाटलं, की सबीर तुझ्याबरोबर आला तर बरं! पण ही नुसती सावधानता. तसं काही भयंकर नाही.

    म्हणजे? नवीनदासुद्धा इतक्या सकाळी ऑफिसला आले की काय?

    होय. सबीरला तुझ्याकडे पाठवण्याची कल्पना नवीनदांचीच. तुला तर म्हाताऱ्याचा स्वभाव माहीतच आहे. ते काही काही वेळा तर हुकूमशहाच असतात! जीवन हसत म्हणाला.

    नवीनदांच्या बाबतीतला जीवनचा हा शेरा ऐकून मानवच्या ध्यानात आलं, की जीवन कशानं तरी अस्वस्थ आहे. नवीन घोष हे ‘बंगाल टाइम्स’चे संस्थापक आणि मुख्य संपादक, त्यांच्याबद्दल केवळ कलकत्त्यात नव्हे, तर साऱ्या बंगालभर आदर होता. जीवनचा सगळ्या गोष्टी हसण्यावारी नेण्याचा स्वभाव मानवला ठाऊक होता; तरीही त्याला त्याचा नवीनदांबाबतचा शेरा विचित्र वाटला.

    हं... यामध्ये काहीतरी गडबड दिसते. काहीतरी मोठा प्रकार आहे.

    ठीक आहे तर मग. सरळ ऑफिसमध्ये ये. आणखी कुठे तडमडू नको कळलं?

    जीवन काय म्हणत आहे यावरून मानव क्षणभर गोंधळला. त्यानं हातातल्या रिसीव्हरकडे दोन सेकंद गोंधळून बघत तो टेलिफोनवर ठेवून दिला आणि सबीरकडे वळून तो म्हणाला, काही तरी मोठं लफडं दिसतंय! चल, मी लगेच तयार होतो.

    दाढी करण्यात वेळ न घालवता, त्यानं थंड पाण्यानंच आंघोळ केली आणि घाईघाईत अंगावर पॅण्ट व खादीचा कुडता चढवला. कपडे घालून तयार होत असताना, त्याच्या डोक्यात कालच्या रात्रीचे विचार घोळत होते. पोलिसी जुलूमजबरदस्तीचा पुरावा मिळवायचा कसा? नक्षलवाद्यांचा एन्काऊंटर कॅमेऱ्यात पकडला गेला पाहिजे हे खरं.

    नक्षलवादी हे पश्र्चिम बंगालमधील बंडखोर कम्युनिस्ट. त्यांचं उग्र राजकीय आंदोलन नक्षलबारी या छोट्या खेड्यात सुरू झालं, म्हणून ते नक्षलवादी!

    मानवनं बिछान्याच्या बाजूच्या पेपरवरून आपलं सीको कंपनीचं मनगटी घड्याळ उचललं आणि तो हातावर बांधू लागला. घड्याळाचा चामडी पट्टा बराचसा झिजला होता! दाराला कुलूप लावून, दोघं बाहेर पडले.

    बसस्टॉपवर त्यांना तांबड्या आणि लाइट बिस्किट रंगाची बस येताना दिसली. दोघांनी धावत जाऊन बसच्या उघड्या फूटबोर्डवर उडी घेतली आणि बसची दांडी दांडी पकडून आत शिरला. जीवनच्या फोनवरील बोलण्यातील गूढ त्याला अस्वस्थ करत होतं. त्यानं कशासाठी एवढ्या लवकर बोलावलं असेल याच्या शक्यता तो अजमावू लागला आणि त्याचं डोकं विविध विचारांनी अक्षरशः फुटायची वेळ आली.

    सबीरच्या दिशेला थोडं झुकून, मानव म्हणाला, रानकनं काहीतरी उपद्व्याप निर्माण केलेला दिसतो.

    शक्य आहे. सबीरनं खांदे उडवले.

    बसमधल्या एका सिनेमापोस्टरकडे बघत त्याची नजर बाजूला बसलेल्या ‘बंगाल टाइम्स’ वाचणाऱ्या माणसाकडे वळली. त्याच्या हातातलं क्रीडापान पाहताना त्याच्या ध्यानात आलं, की त्या पानावर फोटोच नाही! काल फोटो डेव्हलप करताना काहीतरी अडचण आली असणार, फोटोशिवाय क्रीडापान काहीच कामाचं नाही!

    ‘चल रे ठोंब्या, लवकर चल. इथं नको थांबवू ना! माझ्याकडे वेळ नाही.’ थांबलेल्या ड्रायव्हरला मनातल्या मनात शिव्या घालत असताना, त्याला पोलिस जीपच्या सायरनचे कर्कश आणि वातावरण भेदून टाकणारे आवाज ऐकू आले. त्यानं पाहिलं, की बसच्या पाठीमागे तीन पोलसजीप येत आहेत. त्यांना पाहून मानवचं विचारचक्र सुरू झालं. तीन जीप! काहीतरी मोठं घडलेलं दिसतंय. काल रात्री किती नक्षलवाद्यांनाठार मारलं, कुणास ठाऊक?

    ऑफिसच्या स्टॉप जवळ त्यानं बस थांबण्याची वाट न पाहता बाहेर उडी मारली. सबीरही त्याच्या मागोमाग बसमधून उतरला. दोघं ऑफिसच्या दिशेनं चालू लागले.

    प्रकरण २

    ‘बंगाल टाइम्स’ची कचेरी सेंट्रल अॅव्हेन्यूमध्ये छोट्या दोनमजली इमारतीत होती. नवीनदांच्या एका मित्रानं मृत्युपत्रात ही इमारत ‘बंगाल टाइम्स’ला बहाल केली होती. इमारतीला दोन दारं होती. पुढचं दार माणसांच्या येण्या-जाण्यासाठी वापरलं जाई आणि मागच्या दारातून छापलेल्या पेपरचे गठ्ठे बाहेर पडत. पुढच्या दारालगत गुलमोहराचं झाड होतं. त्याखाली एक-दोन बाकं ठेवलेली होती. तिथं वृत्तपत्राकडे भेटीस येणारे लोक, वार्ताहार आणि इतर कर्मचारीवर्ग यांचा धुम्रपान आणि गप्पा यांसाठी अड्डा जमलेला असे. स्थानिक अथवा राष्ट्रीय निवडणुकांच्या वेळी तर तेथील गप्पांना ऊत येई आणि वातावरण गरमागरम असे.

    मानव दारापाशी आला तेव्हा त्यानं पाहिलं, की जीवन तिथं एकटा सिगारेट ओढत उभा आहे. जीवन उंच होता. त्याची तब्येतही भरभक्कम होती. दिसायला सावळा. सकाळच्या सूर्यप्रकाशात त्याच्या चष्म्याच्या काड्यांचा रंग चेहऱ्यावर पसरल्यानं त्याला वेगळाच उजाळा आलेला होता. मानवचं लक्ष जीवनच्या पाठीमागे असलेल्या ‘बंगाल टाइम्स’च्या विटलेल्या बोर्डाकडे गेलं. जीवनकडे बघत मानवनं हात उंचावला व चालत जाऊन थेट त्याच्यासमोर प्रश्नार्थक चेहरा करून उभा राहिला. जीवनला दाट केसांच्या मोठ्या दाढी-मिशा होत्या. त्यांत तो ओढत असलेल्या सिगारेटचा धूर घरंगळत होता. बघता-बघता, तो धूर मानवच्या नाकापर्यंत जाऊन पोचला.

    लगेच, मानवनं भुवया उंचावत जीवनला विचारलं, आता सांग, काय बातमी आहे? मला ती ताबडतोब कळलीच पाहिजे!

    थांब रे! प्रथम मस्त सिगारेट तर ओढू.

    विनोद खूप झाला. आता जे घडलंय ते सांगितलं नाहीस तर बघ! मानवच्या आवाजात जरब होती, पण तरी त्याला हसूही आवरेना.

    जीवननं विचारलं, बघ, ऐकण्याची तुझी तयारी आहे?

    साsल्या मानवनं जीवनच्या गळ्याजवळ आपले हात नेले. जणू त्याला त्याचा गळा आवळायचा होता.

    जीवननं आजुबाजूला पाहिलं. बघता, बघता, त्याचा चेहरा गंभीर झाला आणि तो मानवच्या कानात पुटपुटला, रानकचा त्याच्या बंगल्याच्या बाहेर आज सकाळी खून झाला! आणि तो मानवच्या चेहऱ्यावरचे भाव निरखू लागला.

    मानव ओरडला, काsय? काय म्हणतोयस? रानक? म्हणजे?

    होय, तेच ते, आपले गृह आणि सुरक्षा मंत्री -

    चल, जोक नको मारू! तुझी जोक मारण्याची सवय माहीत आहे मला.

    खरंच. बातमी पूर्णपणे खरी आहे. जीवनचा चेहरा गंभीर होता.

    भयंकर घटना आहे, पण तुला फोनवर सांगायला काय झालं होतं?

    आम्हाला असं वाटलं, की तुला बातमी फोनवरून सांगितली तर तू सरळ त्याच्या बंगल्याकडे जाशील, आणखी बातमी मिळवावी म्हणून. म्हणून नवीनदांनी आणि मी विचार केला की सबीरला तुझ्याकडे पाठवावं. तू सरळ तिकडे गेलास आणि त्याच्या एखाद्या भडकलेल्या चेल्यानं तुझ्यावर हल्ला चढवला तर! अशी भीती आम्हाला वाटली. म्हणूनच तुझ्याऐवजी अरूपला पाठवलं तिकडे, बातमी कव्हर करायला.

    मी काय घाबरतोय की काय त्यांना? ते पळपुटे आहेत.

    भ्याड टोळकी जमली तर बेभरवशाची बनतात. पण मानव, तू ऑफिसला येईपर्यंत कुतूहलानं अगदी मरायला टेकला असशील ना? जीवननं हसऱ्या चेहऱ्यानं विचारलं.

    पुन्हा तू असं केलंस तर याद राख! त्यानं जीवनला विचारलं, केव्हा घडलं हे?

    पहाटे पाचच्या सुमारास.

    बातमी कितपत खात्रीची? आणि बातमी कुणी दिली?

    पक्की खात्री आहे! पोलिसमधल्याच आपल्या नेहमीच्या खबऱ्यानं फोन करून सांगितली.

    नक्की झालं काय?

    आज सकाळी फिरायला म्हणून रानक बंगल्याबाहेर पडला आणि थोड्या वेळातच, पाचच्या बेताला बंगल्याच्या गेटवरील सुरक्षारक्षकांनी गोळीबाराचा आवाज ऐकला. ते धावत आवाजाच्या रोखानं गेले, तर रानक रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला होता. त्याच्या डोक्यामध्येच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. रक्षकानं त्याला रुग्णालयात नेलं, परंतु तिथं, त्याचा मृत्यू झाला असल्याचं घोषित करण्यात आलं. एवढं बोलून जीवन थांबला आणि तसंच, हसत हसत पुढे म्हणाला, राक्षस! आता असेल नरकात, आपल्या अपकृत्यांचा पाढा वाचत.

    मानव नकारात्मक, खिन्नपणे डोकं हलवत म्हणाला, गोळ्या झाडल्या? छे, छे... फार वाईट झालं. उगाच गोळ्या झाडल्या...

    कमाल आहे तुझी! का बरं? तू का निराश झालास? रानकसारखा बदमाश मेला म्हणून मी तर खूष आहे, बाबा. त्यानं आपली इमारत जाळण्याचा प्रयत्न केला, तुला ठार मारण्याचा प्रयत्न केला, तरी तुला तो मारला गेल्याचा आनंद होत नाही?

    काही असो, पण अशा तऱ्हेनं, त्याला मारण्याचं समर्थन करता येणार नाही.

    खरं तर, मीच त्याला ठार मारला असता. ह्याआधीच त्याची हत्या का झाली नाही ह्याचाच मला अचंबा वाटतो..

    हे बघ, नवीनदा गांधीवादी विचारांचे आहेत आणि आपल्या सगळ्यांचा लोकशाहीवर विश्र्वास आहे. म्हणून त्याच मार्गानं प्रतिकारात्मक लढा दिला गेला पाहिजे. शिवाय, आपण एवढी सारी त्याच्या भ्रष्टाचाराची लक्तरं बाहेर काढली, त्याची कोंडी करत आणली; त्या साऱ्या मोहिमेचा, तो आता मेल्यानंतर उपयोग काय? आपले सारे प्रयत्न आणि एवढा सारा वेळ फुकट गेला. त्यानं जो भ्रष्टाचार केला आणि अत्याचार केले त्याबद्दल त्याला तुरुंगवास व्हायला हवा होता. त्याच्या डोक्यात गोळी घातल्यानं सारा खेळच संपून जातो!

    हं, मला तुझा मुद्दा कळला. त्यानं ज्या अनेक नक्षलवाद्यांना आणि शेतकऱ्यांना तुरुंगात टाकलं आहे, त्यांच्याबरोबर तोही कारावासात खितपत पडला असता, म्हणजे ठीक होऊन गेलं असतं. गोळीमुळे त्या बदमाशाला फार सोपी शिक्षा झाली असं वाटू लागलंय.

    बरोबर बोललास. अशा कृत्यांनी चांगल्या-वाईटातील फरक अस्पष्ट होऊन जातो आणि काही काळानं कोण कशासाठी लढत आहे हेच कळेनासं होतं.

    मला तुझं म्हणणं समजतंय. पण मी तुझ्याशी सहमत मात्र नाही. सध्याच्या व्यवस्थेत राहून, व्यवस्थेचेच संकेत पाळून हे जे तथाकथित लढे दिले जातात ते सर्व व्यर्थ ठरले आहेत. जीवनने सिगारेटचे झुरके भसाभस ओढले. तो पुढे म्हणाला,

    तळापासून वरपर्यंत सगळे साले हरामखोर, भ्रष्टाचारी आहेत. कोर्टंसुद्धा त्यातून सुटलेली नाहीत. त्याच्याविरुद्ध साक्षीदारांनी साक्षी का फिरवल्या हे साऱ्या जगाला कळलेलं आहे आणि जे आपल्या साक्षीला जागून राहिले त्यांचा मृत्यू ओढवला!

    आपण असे सारखे बोलतच राहणार. वाद आणि प्रतिवाद; आणि एवढं होऊनही तुझ्यात काहीही बदल झालेला नाही. मानवनं हे बोलता बोलता त्या दोघांच्या मध्ये तयार झालेला सिगारेटचा धुराचा पडदा हातानं दूर सारायला सुरुवात केली.

    तसं नाही. माझ्यात हळूहळू बदल होत आहे. मी बहुधा नक्षलवाद्यांकडे झुकू लागलो आहे असं मला वाटतं. आणि बघ ना, रानक मेल्याचा आनंद मला झाला आहे. तो आता नरकात कुजत पडला असेल. त्यानं ज्या ज्या नक्षलवाद्यांना आणि गरीब लोकांना छळ करून मारलं त्या सर्वांचे आत्मे त्याच्यावर तुटून पडले असतील.

    हं, असो. त्याच्या मृत्यूसंबंधातला सगळा तपशील गोळा करा. या संबंधांत आपण काही खास बातमी द्यायला हवी. वाचकांची तीच अपेक्षा असेल. मी ही बातमी पाहतो. तसं नवीनदांनाही सांगतो. अरूप रानकच्या बंगल्यावर पोचला असेल का?

    बहुधा पोचला असेल.

    तारक अजून ऑफिसमध्येच आहे का?

    तारक हा ‘बंगाल टाइम्स’च्या रात्रपाळीचा सूत्रधार, जसा जीवन दिवसपाळीचा.

    होय आणखीही काही बातम्या आहेत. पोलिसांनी काल रात्री ‘न्यू कलकत्ता राईस मिल’वर धाड टाकली आणि खबर अशी आहे, की साऱ्या कलकत्ता नगरीमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं करण्याचं कॉलेजविद्यार्थ्यांनी आखलं आहे.

    पोलिसांना राईस मिलमध्ये काही सापडलं का?

    नाही, अजून काही तपशील कळले नाहीत. परंतु मुळात, या मिलचा मालक, उत्पल सेठ याच्या खिशात सारे अधिकारी आहेत. तरीसुद्धा पोलिसांनी त्याच्या मिलवर छापा घातला, हीच आश्र्चर्याची गोष्ट नाही का? जीवन म्हणाला.

    उत्पल सेठ हा कलकत्ता राइस मिलचा मालक. तो काळाबाजारवाला आणि सावकारी करणारा म्हणून प्रसिद्ध होता.

    बाप रे, म्हणजे उद्या खमंग बातम्याच बातम्या! ‘बंगाल टाइम्स’चे सगळे अंक खपून जाणार उद्या! प्रति जास्त छापायला पाहिजेत.

    वा! संपादकाला अशा दिवसाचीच स्वप्नं पडत असतात आणि तेवढीच, असा एकही दिवस उगवू नये अशी भीतीही वाटत असते. असा दिवस! पण ठीक आहे, रानक तर मेला ना! जीवन किंचित हसला. त्यानं सिगरेटचं थोटुक विझवलं आणि खाली टाकून दिलं. आज पेढेच वाटले पाहिजेत, च्यायला.

    मानव तसाच इमारतीत घुसला. आत जाताच, त्याच्या नाकात वर्तमानपत्राच्या छापखान्यातला शाईचा आणि कोऱ्या कागदांच्या रिळाचा दर्प शिरला. इमारतीत शिरताच लागणाऱ्या पहिल्या दालनात डावीकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी काही खुर्च्या मांडलेल्या होत्या. उजव्या बाजूला, रिसेप्शनिस्ट उमा हिचं टेबल आणि त्यावर दोन-तीन फोन. त्याच्या पलीकडे मोठं टेबल होतं. तिथं जीवन आणि तारक हे दिवस व रात्रपाळीचे संपादक बसत. त्यापलीकडे मुख्य संपादक, नवीनदा यांची केबिन होती.

    बाकी साऱ्या हॉलमध्ये टेबल-खुर्च्या होत्या. त्यांवर वार्ताहर, उपसंपादक वगैरे मंडळी बसत. प्रत्येक टेबलावर न्यूजप्रिंटच्या कापलेल्या कागदांचा लिहिण्यासाठी मोठा ढीग असे आणि त्याचबरोबर छापलेली वर्तमानपत्रं, त्यातील कात्रणं असं सारं साहित्यही.

    मानव नवीनदांच्या केबिनमध्ये घुसला. नवीनदांची केबिन म्हणजे सर्वत्र पुस्तकांचे गठ्ठेच गठ्ठे रचून ठेवलेले होते. केबिनमध्ये पुस्तकांसाठी काचेची दोन-तीन कपाटं होती. तीदेखील पुस्तकांनी ओथंबून वाहत होती. पुस्तकं, मासिकं, नकाशे, कोश असं वाचनाचं आणि संदर्भाचं सारं साहित्य होतं. संपादकाच्या खुर्चीमागे भिंतीवर महात्मा गांधींचा फोटो टांगलेला होता.

    नवीनदा फोनवर बोलत होते. ते कशात तरी व्यग्र असले, म्हणजे त्यांचा हातानं गांधीटोपीबरोबर खेळ चाले. नवीनदा हे कट्टर गांधीभक्त. मानवला येताना पाहून त्यांनी फोनवरचं बोलणं आटोपतं घेतलं, रिसिव्हर जागेवर ठेवला आणि त्यांच्या फिरत्या खुर्चीतून उठून उभे राहिले. नवीनदा उंच, शेलाटे होते.

    त्यांनी अंगातलं काळं जाकिट ठीकठाक केलं आणि म्हणाले, ये मानव. मानवच्या चेहऱ्यावरील प्रश्नार्थक भाव पाहून, लगेच टेलिफोनकडे बोट करत ते म्हणाले, काही खास नाही. अनाथाश्रमाला फोन केला होता. तिथं मुलंच मुलं झाली आहेत आणि त्यांच्याकडे नवीन भरती करण्यास जागा नाही. हे बोलत असताना टेलिफोन बाजूला सरकावत तसंच ते पुढे म्हणाले, तुझी अन् जीवनची भेट झाली का? त्यानं तुला सारं सांगितलं असेलच.

    होय.

    तुला न सांगता अशा पद्धतीनं बोलावलं ह्याबद्दल माफ कर. पण कोणीतरी फोन करून तुला उठवलंच असतं. आणि रानकच्या मृत्यूचं कळताच तू ताडकन त्याच्या बंगल्याकडे धावला असतास. किती वाईट बातमी आहे ना! कुणी मारलं असेल त्याला? नवीनदांचा आवाज नेहमीसारखा शांत, धीरगंभीर होता. पण त्यांच्या चेहऱ्यावर ताण जाणवत होता.

    बहुधा, नक्षलवाद्यांचेच हे कृत्य असेल. एकतर, ते त्यांच्या विचारसरणीशी सुसंगत आहे आणि दुसरं म्हणजे, अशा हत्येपासून त्यांनाच लाभ होण्याची जास्त शक्यता आहे. परंतु रानकला मारावं किंवा तो मारला जावा अशी शेकडो लोकांची इच्छा असणार. पण ठामपणे सांगता येत नाही. इतक्यात माझं लक्ष नव्हतं रानककडे. सध्या, मी शिक्षणमंत्र्यांच्या लफड्यांकडं बघत होतो. त्यांनी शाळांना मिळणारं अनुदानच हडप करणं आरंभलंय.

    ठीक आहे. मला असं वाटतं, की तू सध्या तरी काही काळ शांत राहा. फार सनसनाटी बातम्या देऊ नकोस. तू स्वतः त्याच्या बंगल्याकडे फिरकूही नकोस. अरूप रानकच्या हत्येची बातमी देईल.

    नाही, नाही. तसं नको. मी करेन ना बातमी कव्हर. यावेळी बंगल्यावर राजकारणाच्या खेळी समजतील. रानकचं गृहमंत्रालयाचं खातं... प्रत्येक राजकारण्याची त्यावर नजर आहे. मी त्याच्या बंगल्यावर गेल्यानं काही प्रश्न उद्भवेल असं मला वाटत नाही.

    अशा वेळी भावना क्षुब्ध असतात. तू जश्या प्रकारे रानक ची अंडीपिल्ली बाहेर काढली आहेत त्यामुळे ते आधीच तुझ्यावर डूख धरून आहेत. तुला तिथं पाहून त्यांचे चेले भडकतील आणि परत हाणामारीवर येतील. ती रात्र आठवते ना?

    हं. जुनी झाली ती गोष्ट. मानव म्हणाला.

    त्याला तो प्रसंग आठवला. वेळ रात्रीची होती. कॉफी हाऊसमधील गप्पाष्टक संपवून घरी परतताना तो ट्राम पकडण्यासाठी रस्त्यावर उभा होता. रस्त्यावर रहदारी तुरळक होती. एवढ्यात, एक पांढरी अम्बेसडर कर्कशपणे ब्रेक दाबत त्याच्याजवळ येऊन थांबली. तिच्यातून पाच रानकचे गुंड बाहेर पडले. त्यांच्या हातात लाठ्याकाठ्या आणि हॉकीच्या स्टिक होत्या. त्यांनी मानवभोवती रिंगण घातलं आणि त्याला बडवून काढण्यास सुरुवात केली. मानवनं प्रतिकार केला, पण तो एकटा फार निर्बल ठरला. सुदैवानं, तेवढ्यात ट्राम आली आणि तिच्यातून उतरणारे दोघं – एक पोलिस हवालदार आणि एक तरुण, हे दृश्य पाहून मानवच्या मदतीला आले. त्या तिघांनी मिळून पाच जणांवर प्रतिहल्ला चढवला आणि त्यांना पळवून लावलं. तो पोलिस हवालदार आणि तरुण – त्याचं नाव शिब. ते मदतीला आल्यामुळे मानव वाचला, तरी त्या हल्ल्यानंतर, तो प्लॅस्टरमध्ये उजवा पाय अडकावून जवळजवळ महिनाभर घरी बसून होता.

    मानव म्हणाला, ठीक आहे. मी संपादकीय लिहितो. आपल्या मोहिमेचा पूर्वीचा प्रतिसाद ध्यानात घेता आपण वीस हजार जादा प्रती छापायला हव्यात असं मला वाटतं. माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. रानकच्या माथी अप्रत्यक्ष दोषारोप टाकायचा. त्याच्या खुनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था कशी ढासळली आहे हे लक्षात येतं असं म्हटल्यानं ती टीका अंतिमतः त्याच्यापर्यंतच पोचते.

    नवीनदा क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले, तारेवरची कसरत आहे. अशा भडक प्रसंगी इतका बारीक विचार कोणी करू शकत नाही. पण तू म्हणतोस तर प्रयत्न करून बघू. तुला लोकभावनेची नाडी अचूक कळते यावर माझा विश्वास आहे. परंतु आजचं संपादकीय लिहिणार मीच. शिवाय, आज आपल्याला पूर्व पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवून राहावं लागणार आणि कलकत्ता राईस मिलवरील हल्ल्याचे काही तपशील कळले का?

    बघतो. मी तपशील मिळवतो. खरंतर, माझी आज शिक्षणमंत्र्यांबरोबर भेट ठरली होती. पण ती होईल असं वाटत नाही.

    मानव नवीनदांच्या केबिनमधून बाहेर पडला आणि सरळ आपल्या टेबलाकडे गेला. छापखान्याची यंत्रं हॉलच्या उजव्या टोकाला कोपऱ्यात बसवलेली होती. सकाळची वेळ असल्यानं ऑपरेटर ती यंत्रं साफ करण्यात गुंतले होते. खिडक्यांतून झिरपणाऱ्या सूर्यकिरणांत हॉलमधील कचरा आणि हवेतील पेपरधूळ अधिकच प्रकर्षानं जाणवत होती.

    या शांततेचा एकाएकी भंग झाला तो तारकच्या आरोळीनं, तो आपल्याच जागेवरून जोरजोरात बोलू लागला, ए शेरलॉक होम्स, प्रत्येकाच्या तोंडी तुझंच नाव आहे. सगळे विचारताय मानवकडे काही आतली बातमी आहे का?

    मानव किंचित हसला आणि तेवढ्याच जोरात म्हणाला,शेरलॉक होम्सचा पाईप आणि टोपी कुठेय? आणि का रे, मला आधी का नाही बोलावून घेतलं.

    मला बातमी कळताच मी नवीनदांना फोन केला. त्यानंतर तुला फोन करायचं डोक्यात होतं. पण नवीनदांनी बजावलं, की मी तुला कळवू नये म्हणून.

    आज सकाळी तुम्ही मला जे धास्तावलंय तो काही जोक नव्हता. मी काळजीत पडलो होतो.

    काळजी? कसली काळजी? रानक तर मरून गेला. आता नाही आपल्या इमारतीला कोणी आग लावणार. तारक बोलता बोलता हसला आणि त्याचबरोबर त्याचं सारं शरीर हललं. त्याच वेळी वाजत असलेला टेलिफोन उचलून त्यावर तो बोलू लागला, ...हो, बातमी खरी आहे. आज सकाळी... अहो, हे सारे तपशील उद्याच्या पेपरात असतील... नाही. कोणी हत्या केली ते अजून कळलेलं नाही. तारकनं रिसीव्हर फोनवर आदळला आणि तो मानवकडे पाहत म्हणाला, पाहिलंस, माझ्या टेबलापासून मला जरासुद्धा हलता येत नाही! त्याची दमणूक त्याच्या छोट्या गोल चेहऱ्यावर दिसत होती. तो आणखी काही बोलणार तोच फोनची घंटा पुन्हा वाजू लागली. त्यानं फोन उचलला आणि तो यंत्रवत बोलू लागला, होय, बातमी खरी आहे. कोणी मारलं हे मला कसं कळणार?

    मानव स्वतःशीच हसला. त्यानं टेबलावरचं कॅलेंडर उचलून हातात घेतलं, कालच्या तारखेचा कागद फाडून टाकला. त्याच्यासमोर मोठ्या अक्षरांत तारीख दिसू लागली... १९ सप्टेंबर १९६९. त्याच्या मनात आलं, आणखी एक दिवस गेला. आजचा दिवसही उडून जाईल! मग तो समोरच्या भिंतीकडे एकटक पाहत बसला. जणू त्या भिंतीतील अदृश्य खुणेकडे पाहत तो ध्यानमग्न झाला आहे! पण ही अवस्था फार वेळ टिकली नाही. त्याची नजर टेबलावरील बातम्यांच्या ट्रेकडे गेली. त्यानं त्यातले कागद उचलले. तो ते वाचू लागला. काही बातम्यांतील अर्थ शोधू लागला. पण हळुहळू सगळीकडे पसरत राहिलेले त्याच्या मनातील विचार रानकवर येऊन केंद्रित झाले आणि त्याची एकाग्रता भंग पावली, टेलिफोनच्या रिंगनं.

    टेलिफोनवर, पलीकडे शिब होता. ट्रामच्या स्टॉपवरील हल्ल्यातून वाचल्यानंतर शिबची आणि त्याची दोस्ती जमली होती. शिब कम्युनिस्ट होता आणि कम्युनिस्ट पक्षामध्ये त्याचे चांगले लागेबांधे होते.

    फोनवरून पलीकडून शिब म्हणाला, अरे चेंगीझ, सकाळी सकाळी झकास बातमी आहे ना!

    हो, म्हटलं तर!

    म्हणजे? आता कुठलं खुसपट? पेढे वाटायचे सोडून....

    हं. मला म्हणायचंय की त्याची सुटका फार सहज झाली. आपण त्याला तुरुंगात घालू शकलो नाही. मानव टेबलावरच्या पेपरवेटशी खेळत म्हणाला.

    हं, म्हणजे विजय तुझ्या हातातून हिसकावला गेला.

    तसंच काही नाही. पण आपला फटका वाया जाईल आता.

    मला असं वाटतं, की तुझा जय झाला आहे. तू त्याचा भ्रष्टाचार उघड केल्यानंतर त्याच्या लोकप्रियतेला तडे गेले. तो पुन्हा निवडून आला असता की नाही, शंका आहे. अर्थात, निवडणूक केंद्रच लुटली गेली असती, ती गोष्ट वेगळी! पण सुटका झाली सर्वांचीच, तुझ्यामुळे शक्य....

    नाही. याचं श्रेय नवीनदांना द्यायला हवं. मला नाही. त्यांच्या पाठिंब्याशिवाय मला ही प्रकरणं छापता आली नसती. त्यांच्यावर किती राजकीय आणि आर्थिक दबाव आला! रानकनं आमच्या पेपरची इमारत जाळण्याचा प्रयत्न केला. पण नवीनदा या साऱ्यासमोर ताठ उभे राहिले.

    खरं? मी आगीबद्दल ऐकलं होतं. पण त्यामागे रानक आहे हे मला ठाऊक नव्हतं. काय, काय घडलं होतं?

    वर्षापूर्वी आम्ही त्याच्या ‘रोझ पार्क’ भूखंडाबाबतचं प्रकरण छापलं होतं. त्यानं धमक्या दिल्या, तरी त्याला भीक घातली नाही. मग त्यानं पक्षाच्या काही कार्यकर्त्यांना आमच्याविरुद्ध चिथावलं. एका रात्री ते आले आणि त्यांनी इमारत पेटवून दिली. हे सर्व आधी ठरवून झालं असणार. कारण तारकनं पोलिसांना, अग्निशामक दलाला फोन केला. पण कोणी धावून आलं नाही. तेव्हा तारकनं आजुबाजूच्या लोकांना उठवलं. त्यांनी साखळी तयार केली आणि हातांनी पाणी मारून आग विझवली. तरी बऱ्याच यंत्रसामग्रीचं नुकसान झालं ते झालंच. मानवचा पेपरवेटशी चाळा चालूच होता.

    साला! रानकची कोणत्याही पातळीवर उतरण्याची तयारी होती.

    हं.

    मग आता पुढे काय? मला रानकविरुद्ध आणखी पुरावे मिळतील बहुधा.

    आता पुरावा मिळवणं सोपं आहे. पण त्याचा फायदा काय?

    हो. पण आता पुढे काय? घरी बसायचं? शिबनं स्वतःचे ओठ दाबून ओढल्यासारखा आवाज मानवला फोनवर ऐकू आला.

    ठीक आहे. एक लढाई संपली. भ्रष्टाचाराविरुद्धचं युद्ध चालूच राहणार! मानव म्हणाला, पण लगेच हसला आणि उद्गारला, मी फार तत्त्वज्ञान्यासारखा बोलतोय का आत्ता.

    तत्त्वज्ञान गेलं गाढवाच्या गांडीत. मला फक्त सांग, आता कोणाच्या पाठी लागायचं?

    तुलाही लढाई आवडते ना! रानकची गच्छंती झाल्यानंतर तुला दुसऱ्या कोणालातरी धुऊन काढायचं आहे.

    तुझी आवड तीच माझी आवड. फक्त, लढाई तू सुरू करतोस आणि मग तुझा बचाव करण्यासाठी मी त्यात उडी घेतो. रानकच्या गुंडांपासून तुला वाचवणारा मीच ना!

    ते मी कसं विसरीन? मी महिनाभर लंगडत चालत होतो, त्या हल्ल्यानंतर. तरी तुझ्यामुळे बचावलो.

    च्यायला, बरं आठवलं. तुला एका नक्षलवाद्याची मुलाखत घ्यायची आहे असं तू म्हणाला होतास. मला तसा माणूस मिळाला आहे, जसा तुला हवा तसा! पण तो आजच भेटू शकतो. रात्री ये.

    नेकी और पुछपुछ? फक्त केव्हा आणि कुठे ते सांग.

    आज रात्री साडेदहा वाजता, ‘कॅफे कोहिनूर’च्या बाहेर. ‘रोशीगंज’च्या आत. खोलवर चालत जाण्याची तयारी मात्र ठेव.

    दलदलीमध्ये? ठीक आहे. तू तुझ्याजवळ सुरा ठेव, माझ्याजवळ पेन आहेच. मानव म्हणाला.

    त्या कुठल्या फालतू म्हणीप्रमाणे तुझा जर असा समज असेल, की तलवार किंवा सुरा यांच्यापेक्षा तुझं पेन अधिक सामर्थ्यशाली आहे, तर ती तुझी महाचूक होय. कारण केवळ रोशीगंजमध्ये नाही तर, साऱ्या कलकत्त्यात सुरा जवळ असलेलाच फायद्याचा. त्यानं स्वतःचे ओठ चोखत असल्यासारखा आवाज केला.

    काय जास्त उपयुक्त पडतं ते माहीत नाही! परंतु माझ्या पेनकडे अनेक सुरे आकर्षित होतात हे नक्की. बरं, ते जाऊ दे. रात्री साडेदहा वाजता भेटतो.

    रानकबाबतचे विचार त्याच्या मनात पुन्हा सुरू झाले. त्याला कोणी मारलं असेल बरं? त्यानं खुन्याला इतक्या जवळ येऊ दिलं कसं? म्हणजे बहुधा तो त्याला ओळखत असणार. कोणीतरी व्यक्तिगत सूड घेतला असेल का? कदाचित, नक्षलवाद्यांनी त्याची हत्या केली असेल. कारण रानकच्या मृत्यूपासून सर्वात जास्त फायदा होणार आहे तो नक्षलवाद्यांचा! रानकच्या कठोर कारवायांमुळे नक्षलवाद्यांवर संकट गुदरलं होतं. शिवाय, वर्गशत्रूला राजकीय कारणासाठी ठार करणं त्यांच्या सिद्धांतात बसतंच!

    असे उलटसुलट विचार त्याच्या मनात सुरू असताना काही प्रतिमा त्याच्या डोळ्यांसमोर तरळल्या. त्याला आठवलं, की मानवनं रानकला एका जाहीर सभेत अडचणीत टाकणारे प्रश्र्न विचारले तेव्हा रानक चिडला आणि त्यानं मानवच्या अंगावर काचेचा पेपरवेट फेकून मारला. दुसऱ्या एका प्रसंगात रानकनं आपल्या पक्षकार्यकर्त्यांना त्याच्याविरुद्ध चिथावलं होतं. त्याला गंमत अशी वाटली, की रानकच्या आक्रमक हालचालींच्या अशा अनेक आठवणी त्याच्या मनात साकारत असताना त्याच्या डोळ्यांसमोर रानकचा चेहरा काही नीट उमटत नव्हता. जणू रानक त्याच्या स्मृतींमधून धूसर होत चालला होता. रानकची स्मृती पुसून टाकायची असा निर्णय त्याच्या मनानं केला की काय? . की मी त्याच्या बंगल्यावर जाण्यासाठी कारण शोधतो आहे?

    तो हळूच, आवाज न करता, सगळ्यांची नजर चुकवीत इमारतीच्या मागच्या दारानं बाहेर पडला व झपाझप चालत बसस्टॉप वर पोहोचला. रानकच्या बंगल्याकडे जाणाऱ्या बसमध्ये फार गर्दी होती. त्याच्या शेजारी दोन्ही बाजूंस दोन गलेलठ्ठ बायका उभ्या होत्या. त्यामध्ये तो अगदी सँडविच होऊन गेला. तेवढ्यात जवळच्या एका प्रवाशानं विडी पेटवली आणि तिचे झुरके घेणं सुरू केलं. तो दर्प मानवच्या नाकात घुसला. बसमध्ये सर्वत्र चिरकाल तारुण्य टिकवण्याच्या आणि संभोगशक्ती वाढवण्याच्या जाहिराती चिकटवलेल्या होत्या. एक जाहिरात त्याला वेगळी दिसली. तिच्यात पॅण्ट घातलेला एक माणूस लोकांनी धोतर वापरणं सोडावं आणि पॅण्ट वापरणं सुरू करावं असं आवाहन करत होता. त्याच त्या जुन्या जाहिराती पाहून कंटाळलेल्या मानवला ही वेगळी जाहिरात गमतीदार वाटली.

    रानकचं राहणं श्रीमंती वस्तीत होतं आणि मानवला त्याच्या घरापर्यंत पोचण्यासाठी बसस्टॉपपासून बरंच चालत जावं लागलं.

    प्रकरण ३

    मंत्रिसाहेबांचा बंगलाही भलामोठा होता आणि त्या सभोवतालच्या हिरवळीवर पक्षकार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते. त्यातले काही मानवला पत्रकार म्हणून ओळखतही होते. दारातून आत शिरता शिरता, मानवनं सवयीनं आपलं पत्रकार असल्याचं कार्ड बाहेर

    Enjoying the preview?
    Page 1 of 1